कुलगुरूंविरोधात अभाविपचे आंदोलन
By admin | Published: January 8, 2016 02:25 AM2016-01-08T02:25:51+5:302016-01-08T02:25:51+5:30
विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी वेळ देत नसल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना
मुंबई : विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी वेळ देत नसल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र देशमुख यांची भेट न झाल्याने कार्यकर्त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे प्रतीकात्मकरीत्या खुर्चीवर दगड ठेवून कुलगुरूंना निवेदन दिल्याचे आंदोलन केले.
गेले अनेक दिवस मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंना भेट मागूनही कुलगुरू भेट देणे टाळत असल्याचा आरोप अभाविपने केला आहे. त्यामुळे कुलगुरूंना गाठून त्यांना घेराव घालून विद्यार्थी परिषदेच्या मागण्यांचे निवेदन देण्याचा संघटनेचा प्रयत्न होता. मात्र कुलगुरू न भेटल्याने प्रतीकात्मकरीत्या म्हणजेच खुर्चीवर दगड ठेवून त्या प्रतीकात्मक कुलगुरूंना विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे निवेदन सादर केल्याचे संघटनेने सांगितले.
या निवेदनात वारंवार उशिरा लागणारे निकाल वेळेत लावण्याची मागणी संघटनेने केली आहे. मुंबई विद्यापीठातून गुणपत्रिका मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना होणारा त्रास तत्काळ थांबवण्याची मागणीही संघटनेने केली आहे. विद्यापीठाच्या जागेत झालेली अनधिकृत बांधकामे पाडून संबंधित जागा विद्यापीठ प्रशासनाने ताब्यात घेण्याचे आवाहन संघटनेने केले आहे. मागण्या वेळेत पूर्ण केल्या नाहीत, तर १० हजार विद्यार्थ्यांचा मोर्चा विद्यापीठात धडक देईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.अभाविपच्या मागण्या
विद्यापीठात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना राहता येईल, एवढ्या क्षमतेची वसतिगृहे विद्यापीठात उभारावीत.
के.बी.पी. विद्यार्थी वसतिगृहाचे नूतनीकरण करावे. विद्यापीठात जिमखाना सुरू करावा. ज्यात स्विमिंग पूल, प्रशिक्षकासह व्यायामशाळा आणि सर्व खेळांचा समावेश असेल.
विद्यापीठाने स्वत:च्या निधीतून एमफिल व पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी. जेणेकरून गरीब व दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थी उच्चशिक्षण घेऊ शकतील.
विद्यापीठातच विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन केंद्र उभारावे.