मुंबई : दररोज मध्य रेल्वे मार्गावरील लोकल अवेळी इच्छितस्थळी पोहोचत असल्याने प्रवाशांना ‘लेट मार्क’ लागतो. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील प्रवासी संघटना आक्रमक झाल्या असून, रेल्वेच्या गलथान कारभाराबाबत आंदोलन करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.मध्य रेल्वे मार्गावरील अनेक वर्षांपासून रखडलेले प्रकल्प, लांब पल्ल्यांच्या गाड्यांची वाढलेली संख्या, लोकलची कमी संख्या, वारंवार होणारे सिग्नल बिघाड, ओव्हरहेड वायर तुटणे, रुळांना तडे जाणे, झाडाच्या फांद्यांमुळे रेल्वे खोळंबणे अशा अनेक कारणांमुळे लोकलला दररोज ३० ते ४५ मिनिटे उशीर होतो. याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे. याच्या निषेधार्थ १ जुलै रोजी हाताला काळ्या फिती बांधून प्रवास करण्याचा निर्णय प्रवासी संघटनेने घेतला आहे. ठाणे रेल्वे प्रवासी संघ, कल्याण-कसारा प्रवासी संघटना, महाराष्ट्र महिला रेल्वे प्रवासी संघटना, उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघ, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था यांच्या वतीने उपनगरीय रेल्वे प्रवासी मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभाराविरोधात आंदोलन करणार आहेत.‘प्रवाशांनी आंदोलनात सहभागी व्हावे’मध्य रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे एकाच लोकलमध्ये दोन ते तीन लोकलची गर्दी जमते. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गेल्या महिन्यात अनेक कारणांमुळे ५०० हून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या असल्याचे प्रवासी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. प्रवाशांनी १ जुलै रोजी लोकलमधून प्रवास करताना हाताला काळी फीत बांधून मध्य रेल्वेच्या गलथान कारभाराचा निषेध करावा, असे आवाहन उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी केले.