शुल्कवाढीविरोधात मंत्रालयासमोर आंदोलन
By admin | Published: June 21, 2017 03:01 AM2017-06-21T03:01:13+5:302017-06-21T03:01:13+5:30
शाळेच्या शुल्कवाढीपाठोपाठ आता वैद्यकीय महाविद्यालयांच्या शुल्कवाढीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शाळेच्या शुल्कवाढीपाठोपाठ आता वैद्यकीय महाविद्यालयांच्या शुल्कवाढीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रत्नागिरी येथील बी. के. एल. वालावलकर वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी आणि पालकांनी मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मंत्रालयासमोर निदर्शने केली. गेल्या तीन महिन्यांपासून शुल्कवाढ थांबवावी, म्हणून प्रयत्नात असणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त आश्वासने मिळाल्याने त्यांनी आंदोलन पुकारले.
वालावलकर वैद्यकीय महाविद्यालयाने यंदा वार्षिक शुल्क ७ लाख २५ हजार इतके केले आहे. ८६ टक्के शुल्कवाढ केल्याने विद्यार्थी आणि पालकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. महाविद्यालयाला शुल्कवाढ करण्यास शिक्षण शुल्क प्राधिकरणाने मंजुरी दिल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.
प्राधिकरणाने विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ मागितली होती. गेल्या तीन महिन्यांपासून प्राधिकरणाने टोलवाटोलवी केली. त्यानंतर, विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यावर प्राधिकरणाने मंगळवारची वेळ दिली, पण या वेळीही प्रमुख अधिकारी भेटले नाहीत.
प्राधिकरणाकडून २८ जूनची तारीख चर्चेसाठी देण्यात आली. यामुळे विद्यार्थी व पालकांनी मंत्रालयासमोर निदर्शने केली. २८ जूनला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास, आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असे प्रहार विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस अॅड. अजय तापकीर यांनी सांगितले.