Join us

महावितरण दरवाढीविरोधात ४ आॅगस्टपासून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 6:15 AM

२२ टक्के दरवाढीच्या विरोधात राज्यातील सर्व जिल्ह्यात ४ आॅगस्टपासून महावितरणच्या स्थानिक विभागीय, जिल्हा कार्यालयांवर मोर्चे काढण्यात येणार

मुंबई : महावितरणच्या २२ टक्के दरवाढीच्या विरोधात राज्यातील सर्व जिल्ह्यात ४ आॅगस्टपासून महावितरणच्या स्थानिक विभागीय, जिल्हा कार्यालयांवर मोर्चे काढण्यात येतील. वीज ग्राहक व औद्योगिक संघटना राज्यस्तरीय समन्वय समिती, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर यांच्यातर्फे हे आंदोलन करण्यात येईल. राज्यातील किमान २५ जिल्ह्यातील किमान ५० ठिकाणी हे आंदोेलन होईल. यावेळी महावितरणच्या वीज दरवाढ प्रस्तावाची होळी करण्यात येईल.यासंदर्भात नुकतीच वीज ग्राहक व औद्योगिक संघटना राज्यस्तरीय समन्वय समिती आणि महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रिकल्चर यांच्यातर्फे मुंबईत राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत मोर्चाची आखणी करण्यात आली. मोर्चावेळी त्या त्या जिल्ह्यातील स्थानिक मुख्य/अधीक्षक/कार्यकारी अभियंता, जिल्हाधिकारी/प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात येईल. ३१ जुलैपर्यंत प्रत्येक जिल्ह्यातून किमान १०० प्रमाणे २५०००हून अधिक हरकती आयोगासमोर दाखल होतील. आंदोेलन १४ आॅगस्टपर्यंत सुरू राहील.

टॅग्स :महावितरणवीज