वर्सोवा किनाऱ्यावरील टेट्रापॉडच्या विरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:05 AM2021-08-13T04:05:58+5:302021-08-13T04:05:58+5:30
मुंबई : वर्सोवा किनाऱ्यावर सिमेंटची ओंडकी (टेट्रापॉड) टाकण्याचे काम सुरू आहे. ते तत्काळ थांबवले पाहिजे. सागरी पर्यावरणाला त्यामुळे धोका ...
मुंबई : वर्सोवा किनाऱ्यावर सिमेंटची ओंडकी (टेट्रापॉड) टाकण्याचे काम सुरू आहे. ते तत्काळ थांबवले पाहिजे. सागरी पर्यावरणाला त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. त्याविरोधात गुरुवारी सकाळी पर्यावरणप्रेमींनी वर्सोवा येथे प्रतीकात्मक आंदोलन केले.
वर्सोवा किनाऱ्यावर डिसेंबर-२०१९ मध्येही सिमेंटची ओंडकी टाकली जात होती. हा भाग सागरी किनारा नियमन क्षेत्र, तसेच वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत येत असल्यामुळे स्थनिकांनी त्यास आक्षेप घेतला. तेव्हा हे काम थांबले. आता पुन्हा हे काम सुरू झाले आहे.
ट्रेटापॉड टाकण्याचे काम अनधिकृत आहे. त्याचा सगळ्या पर्यावरणावर परिणाम होईल. सागरी पर्यावरण चांगले ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. ट्रेटापॉड नेमके कशासाठी टाकले जात आहेत, हे जनतेचे पैसे कोणासाठी नेमके खर्च केले जात आहेत, असा सवाल पर्यावरणतज्ज्ञ झोरू बाथेना यांनी उपस्थित केला. गेल्या वर्षी संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करून हे काम थांबवण्यात आले. आता ते काम थांबले नाही तर आम्ही कोर्टात जाऊ, असा इशाराही बाथेना यांनी दिला.
सीआरझेडचे हे उल्लंघन असल्याचे सांगितले. नैसर्गिक भरती आणि ओहोटीमध्ये त्यामुळे अडथळा निर्माण होत आहे. लोकांना इथे फिरता येणार नाही, असे वर्सोवा भागातील रहिवासी प्रियांका टिमिन्स म्हणाल्या.
वर्सोवा किनारा वाचवण्यासाठी आम्ही आता पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे दाद मागणार आहोत, अशी माहिती युवक कॉंग्रेसच्या प्रवक्त्या लटाया फर्न्स-अडवाणी यांनी सांगितले.