पाणी टँकरविरोधात आंदोलन

By Admin | Published: April 25, 2016 03:25 AM2016-04-25T03:25:26+5:302016-04-25T03:25:26+5:30

सांताक्रुझ पूर्वेकडील वाकोला येथे खासगी वॉटर टँकर्स विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन छेडत, महापालिकेविरोधात आपला रोष व्यक्त केला

Movement against water tanker | पाणी टँकरविरोधात आंदोलन

पाणी टँकरविरोधात आंदोलन

googlenewsNext

मुंबई : सांताक्रुझ पूर्वेकडील वाकोला येथे खासगी वॉटर टँकर्स विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन छेडत, महापालिकेविरोधात आपला रोष व्यक्त केला. महापालिका भूमिगत जलवाहिनीतून खासगी टँकर्सला दररोज १ रुपया ३० पैसे प्रतिदराने दहा हजार लीटर्स पाणी पुरवते, असा आरोपही मनसेने आंदोलनाच्या वेळी केला.
मनसेने आंदोलनाच्या वेळी पाण्याने भरलेले आणि रिकामे खासगी वॉटर टँकर्स अडवले. आंदोलकांना पांगविण्यासाठी घटनास्थळी पोलीस दाखल झाले, परंतु जोपर्यंत पालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. पालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर, यापुढे टँकर्सने पाणीपुरवठा केला जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर मनसेने आंदोलन मागे घेतले. दरम्यान, येथील रुग्णालय आणि पोलीस वसाहतीलाच पाणी दिले जाईल, अशी भूमिकाही मनसेने घेत, एकही खासगी वॉटर टँकर दिसला, तर पालिका कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही या वेळी दिला. येथील शाखा अध्यक्ष रितेश देसाई, शशी सावंत, संतोष उपलकर, महिला विभाग अध्यक्ष सुगंधा भोगले, सुकन्या सावंत, रविना चव्हाण, अनंत साळे, मंगेश निगुडकर आणि पक्षाचे अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
राज्यात भीषण दुष्काळ पडला असून, मुंबईतही पाणीकपात करण्यात आली आहे. शिवाय मुंबईकरांना पावसाळ्यातपर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे आणि पाणी वाचावे, या उद्देशाने महापालिकेने उद्यानांतील पाण्यावर निर्बंध घातले आहेत. मात्र, पाणी माफियांवर, खासगी वॉटर टँकर्सवर कारवाई करण्यासाठी महापालिका काहीच कारवाई करत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, जेथून खासगी वॉटर टँकर्सला पाणी पुरविले जाते, तेथील जलवाहिनीवर महापालिकेने खास उपकरण बसविले असून, त्यातून हा पाणीपुरवठा केला जातो.
येथे पाणी भरण्यासाठी खासगी वॉटर टँकर्सच्या रांगा लागलेल्या असतात. परिणामी, महापालिका टँकर्सवर एवढी मेहरबान का? असा सवाल मनसेचे विभाग अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांनी आंदोलनाच्या वेळी केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Movement against water tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.