लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई:मुंबई विद्यापीठाची वार्षिक अर्थसंकल्पीय सिनेट सभा आज पडणार आहे मात्र या सभेत विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांशी निगडित अनेक समस्यांवर चर्चा कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सभा सुरू होण्याआधीच माजी युवासेना सिनेट सदस्यांनी विद्यापिठाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू केले आहे. सभेत आधी विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रश्न मांडावेत, त्याची उत्तरे द्यावीत आणि मगच अर्थसंकल्प मांडावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
विद्यापीठाच्या मागील सिनेटची मुदत संपून सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी निवडणुका होऊन नव्या सदस्यांची निवड झालेली नाही. व्यवस्थापन, प्राचार्य, शिक्षक, उच्च पदवीधर, स्टुडंट कौन्सिल आणि नोंदणीकृत पदवीधर मतदार अशा विविध मतदारसंघातून सदस्य निवडून येतात, पण यंदा एकही निवडणूक पार न पडल्यामुळे फक्त नामनियुक्त सिनेट सदस्य आणि अधिकाऱयांचीच उपस्थिती अर्थसंकल्पीय सिनेट सभेला असणार आहे.
दीड महिन्यांपूर्वी मुंबई विद्यापीठाची मतदार नोंदणी संपली. तरी अद्याप एकही निर्वाचित सदस्य निवडणुकअभावी 20 मार्चच्या सभेस उपस्थित राहू शकणार नाही. त्यामुळे विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱया विविध मागण्यांचे निवेदन युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी प्रभारी प्र. कुलगुरू डॉ. अजय भामरे यांना दिले असून या मागण्यांवर सभागृहात चर्चा करून कारवाई करावी, अशी मागणी आधीच केली आहे.
या समस्यांवर निर्णय होणार कधी ?
- कुलगुरू, प्र. कुलगुरू, कुलसचिव, परीक्षा नियंत्रक, संचालक विद्यार्थी कल्याण या प्रभारी पदांवर पूर्णवेळ नियुक्ती कधी होणार? - छत्रपती शिवाजी महाराजांसह महाराष्ट्रातील थोर व्यक्तींविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱया तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निषेधाचा ठराव मंजूर करावा. - विद्यार्थिनींच्या वसतिगृहाला नळावाटे पाणीपुरवठा, नवीन वाचनालय इमारत, स्विमिंग पूल वापरासाठी खुले करावे. - अस्थायी कर्मचाऱयांना किमान समान वेतन आदेशानुसार वेतनकेव्हा अदा करणार.- विविध निवडणुका कधी होणार, अखिल भारतीय टेनिस असोसिएशनने गिळंकृत केलेल्या विद्यापीठाच्या जागेप्रकरणी कारवाई कधी होणार.- मनमानी कारभार करणाऱया खेळ संचालकांवर कारवाई कधी
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"