Join us

छोटा शकीलला भारतात आणण्याच्या हालचाली

By admin | Published: March 21, 2016 3:03 AM

कुख्यात डॉन मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहीमला भारतात आणण्यासाठी एकीकडे देशातील केंद्रीय तपास संस्था आटापिटा करीत असताना आता दुसरीकडे छोटा शकीललाच भारतात आणण्याच्या

डिप्पी वांकाणी, मुंबईकुख्यात डॉन मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहीमला भारतात आणण्यासाठी एकीकडे देशातील केंद्रीय तपास संस्था आटापिटा करीत असताना आता दुसरीकडे छोटा शकीललाच भारतात आणण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाली आहे. छोटा शकील हा दाऊदच्या गुन्हेगारीविश्वाचा वारसदार असल्याचे मानले जाते. शक्य झाल्यास लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या आधी छोटा शकीलला भारतात आणण्याची योजना असल्याचे सूत्रांनी सांगितले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शकील हा धार्मिक कारणास्तव सौदी अरबस्तानात, व्यावसायिक कारणास्तव आॅस्ट्रेलियात तर तेथील डॉक्टरशी विवाह केलेल्या आपल्या मुलीला भेटण्यासाठी त्याचे अमेरिकेत जाणे-येणे सुरू असते. पूर्व आफ्रिका आणि आखाती देशात शकील हा दाऊदचा व्यवसाय पाहतो. रिअल इस्टेट, ज्वेलरी आणि अन्य व्यवसाय शकील पाहतोे. पोलिसांमधील वरिष्ठ सूत्रांनुसार, एकीकडे केंद्रीय गुप्तचर संस्था शकीलच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, तर दुसरीकडे हाती सापडल्यास त्याला भारतात पाठविले किंवा प्रत्यार्पित केले जावे यासाठी संबंधित देशांनाही विश्वासात घेतले जात आहे. मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या देशात प्रवास करीत असताना शकीलला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शकीलकडे कोणकोणत्या नावांचे पासपोर्ट आहेत, याचीही माहिती गुप्तचर संस्थांनी मिळविली आहे. पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत किंवा २०१८ पूर्वी त्याला आम्ही पकडू, असा विश्वासही सूत्रांनी व्यक्त केला. दरम्यान, छोटा राजनला ठार मारण्याची शकीलने यापूर्वीच शपथ घेतलेली आहे. मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात बाली येथे राजनला पकडण्यात आले होते. अर्थात आपल्या माहितीवरूनच त्याला पकडण्यात आल्याचा दावाही अलीकडेच शकीलने केला होता.