सफाई कामगारांचे घरासाठी आंदोलन
By admin | Published: March 24, 2017 01:23 AM2017-03-24T01:23:09+5:302017-03-24T01:23:09+5:30
राज्य शासनाच्या आदेशानुसार सफाई कामगारांना मालकी हक्काची आणि राहती घरे देण्याची मागणी करत अखिल भारतीय सफाई मजदूर
मुंबई : राज्य शासनाच्या आदेशानुसार सफाई कामगारांना मालकी हक्काची आणि राहती घरे देण्याची मागणी करत अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसने गुरुवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. या वेळी मुंबई मनपाच्या २००९ सालच्या भरतीमधील प्रतीक्षा यादीतील कामगारांना कामावर घेण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष गोविंद परमार यांनी केली.
परमार म्हणाले की, मुंबई मनपाने जाहिरात करून केलेल्या भरतीमध्ये १८ हजार कामगारांची प्रतीक्षा यादी केली. त्यातील केवळ दीड हजार कामगार पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने कामावर घेण्यात आले. मात्र उरलेल्या उमेदवारांना प्रतीक्षा यादी केवळ एका वर्षासाठी ग्राह्य असल्याचे कारण देत अधिकाऱ्यांनी यादी रद्द केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी मार्ग काढण्याची संघटनेची मागणी होती. संघटनेच्या आंदोलनाची दखल घेत सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी भेट दिली. मात्र चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनीही बैठकीला उपस्थित राहण्याची मागणी केल्यानंतर संघटनेच्या शिष्टमंडळासोबत अधिवेशनानंतर बैठक आयोजित करण्याचे आश्वासन मिळाल्याचे परमार यांनी सांगितले. २००७ सालापूर्वीच्या सफाई कामगारांना मोफत घरे, २००९ सालच्या भरतीमधील उमेदवारांना कामावर सामावून घेणे आणि गटार व घाणीशी संबंधित अपघाती मृत्यू पावलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना १० लाख रुपये अनुदान अशा प्रमुख मागण्यांवर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचे परमार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)