कमलाकर कांबळे, नवी मुंबई शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे उपलब्ध वाहतूक यंत्रणांवर अतिरिक्त ताण पडत आहे. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदराचा विस्तार, नैना क्षेत्र आदींमुळे भविष्यात दळणवळणाचा मोठा प्रश्न उद्भवणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वाहतुकीला पर्याय उपलब्ध करण्याची महापालिकेची योजना आहे. यासंदर्भात महापालिकेने सादर केलेल्या प्रस्तावाला एमएमआरडीएने अनुकूलता दर्शविली आहे. शहराची लोकसंख्या १२ लाखांच्या घरात पोहचली आहे. शहराचा विस्तार होत असल्याने यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यानुसार वाहनांची संख्याही वाढत आहे. सध्या सायन-पनवेल महामार्ग, पामबीच मार्ग व ठाणे-बेलापूर हे तीन मार्ग शहरवासीयांसाठी उपलब्ध होत आहे. परंतु या मार्गावर दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतूक कोंडीच्या समस्या निर्माण होवू लागल्या आहेत. यातच आता प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाने वेग घेतला आहे. त्यामुळे भविष्यात शहरातील उपलब्ध रस्त्यांवर वाहतुकीचा अतिरिक्त ताण पडणार आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेवून महापालिकेने वाशी-ठाणे व पामबीच मार्गाला समांतर असा वाशी ते बेलापूर असे दोन सागर किनारी मार्ग प्रस्तावित केले आहेत. मार्गाच्या उभारणीसाठी पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक असल्याने महापालिकेने यापूर्वीच एमसीझेडएमएकडे प्रस्ताव सादर केला आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही मार्ग खर्चीक असल्याने त्याची उभारणी करणे एकट्या महापालिकेला झेपणारे नाही. त्यामुळे या दोन्ही मार्गाची निर्मिती एमएमआरडीएने करावी, असा महापालिकेचा प्रस्ताव आहे. यासंदर्भात महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने अलिकडेच एमएमआरडीएला सादरीकरणही केले आहे. त्यानुसार एमएमआरडीएने या प्रस्तावाला अनुकूलता दर्शविली आहे. पहिल्या टप्प्यात वाशी ते ऐरोली दरम्यानच्या १२ किमीच्या मार्गाला एमएमआरडीएने तयारी दर्शविली, त्यासाठी २८00 कोटी खर्च येणार आहे. वाशीगाव येथून खाडी किनाऱ्यावरून कोपरखैरणे, घणसोली, गोठीवली, रबाळे, ऐरोली, दिघा या उपनगरांसाठी मार्ग उपयुक्त ठरणार आहे. प्रस्तावित कोस्टल रोडवरून उपनगरात प्रवेश करण्यासाठी उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे वसाहतीअंतर्गतच्या वाहतूक कोंडीला आळा बसेल. एमएमआरडीएने पहिल्या टप्प्यातील वाशी-ऐरोली दरम्यानच्या कोस्टल रोडच्या निर्मितीला अनुकूलता दर्शविली आहे.
कोस्टल रोडसाठी हालचाली
By admin | Published: September 07, 2016 2:56 AM