मुंबई : कुर्ला येथे सफाईचे काम करत असताना कचऱ्याची गाडी उलटून ३०वर्षीय युनुस शेख हा सफाई कामगार जखमी झाला. त्याला परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, ९ जानेवारी रोजी त्याचा मृत्यू झाला. नियमानुसार त्याच्या कुटुंबीयाला भविष्य निर्वाह निधी आणि निवृत्तिवेतन मिळणे अपेक्षित होते़ परंतु ठेकेदारांनी २००९मध्ये निश्चित केल्याप्रमाणे ही रक्कम न भरल्यामुळे युनुसच्या कुटुंबीयांना हक्क नाकारण्यात आला़ मृत्यूच्या दोन दिवसांनंतरही पालिकेने या प्रकरणाची दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त सफाई कामगारांनी युुनुसचा मृतदेह सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पालिका मुख्यालयासमोर आणला़सफाई कामगारांच्या वारसांना त्यांचा हक्कही नाकारण्यात येत असल्याने सफाई कामगारांमध्ये तीव्र असंतोष आहे़ त्यामुळे आपल्या या सहकाऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी चक्क त्याचा मृतदेह घेऊन शेकडो कामगार पालिका मुख्यालयावर आज दुपारी धडकले़प्रवेशद्वारावर कामगारांच्या मोर्चासह सफेद कपड्यात लपटलेला मृतदेह पाहून सुरक्षा कर्मचारीही हबकले़ महापालिकेत गोंधळ उडाला़ याबाबत वरिष्ठांना कळवताच प्रवेशद्वार बंद करून प्रवेश नाकारण्यात आला़ हा मोर्चा आणणाऱ्या कचरा वाहतूक श्रमिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांची भेट घेतल्यानंतर शेख यांना मदत करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले़ अशी मिळेल मदतयुनुसच्या कुटुंबाला १ लाख १७ हजार रुपयांची आर्थिक मदत, भविष्य निर्वाह निधी वेतन स्वरूपात आणि वारसाला नोकरी देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले़ युनुस याला दोन मुलगे आणि एक मुलगी आहे़
पालिकेसमोर मृतदेहासह आंदोलन
By admin | Published: January 12, 2016 2:45 AM