विमा संरक्षणाच्या मागणीसाठी केईएममध्ये इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:06 AM2021-06-01T04:06:15+5:302021-06-01T04:06:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : परळच्या केईएम रुग्णालयातील इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांनी सोमवारी विविध मागण्यांसाठी केईएम रुग्णालयाबाहेर आंदोलन केले. विमा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : परळच्या केईएम रुग्णालयातील इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांनी सोमवारी विविध मागण्यांसाठी केईएम रुग्णालयाबाहेर आंदोलन केले. विमा संरक्षण द्या, ही प्रमुख मागणी या डॉक्टरांनी केली.
काही दिवसांपूर्वी डॉ. राहुल पवारच्या उपचारासाठी मदत करण्यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली होती. प्रकृती गंभीर झाल्यानंतर मित्रांनी पैसे जमा करून त्याला औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयात दाखल केले होते. उपचारासाठी अधिक आर्थिक मदत करण्यासाठी सोशल मीडियातून दात्यांना आवाहन करण्यात आले होते. पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मदतीसाठी अनेक हात पुढे आले होते. पण अखेर राहुल पवारचे निधन झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील इंटर्न डॉक्टरांनी साेमवारी काळ्या फिती बांधून रुग्णसेवा केली, तर केईएम रुग्णालयाबाहेर इंटर्न डॉक्टरांनी आंदोलन केले.
कोरोना काळात डॉक्टरांची कमतरता भासत आहे. अशा वेळा इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टर्सनाही दिवसरात्र काम करावे लागते आहे. मात्र त्यांना विमा कवच नाही, या मागणीकडे लक्ष वेधूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. पैशांअभावी काही दिवसांपूर्वीच इंटर्नशिप करणाऱ्या एका डॉक्टरचा म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झाला, असा आराेप करत आंदाेलक डाॅक्टरांनी विमा कवच द्यावे, अशी मागणी केली.
.............................................................