Join us

पर्यावरण संवर्धनासाठीची चळवळ धरतेय जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 1:04 AM

‘फ्रायडेज फॉर फ्युचर’ : हवामान बदलासह तापमानवाढीसंदर्भात केली जनजागृती

मुंबई : ‘फ्रायडेज फॉर फ्युचर’ ही चळवळ, हा लढा हवामान बदलासह तापमानवाढीसंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी सुरू असून, नुकतेच दादर आणि ठाणे येथे याबाबत जनजागृती करण्यात आली. निखिल कालमेघ, हृतिक उप्पाला आणि पूजा दोमाडिया ही युवा पिढी मुंबईतून पर्यावरण संवर्धनासाठी आवाज उठवित असून, पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांनी अधिकाधिक सजग व्हावे हा यामागील उद्देश आहे.संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण परिषदेत स्वीडनच्या सोळा वर्षांच्या ग्रेटा थनबर्ग हिने पर्यावरणाच्या हानीबाबत केलेल्या भाषणामुळे अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. याच काळात पर्यावरण संवर्धनासाठी उभ्या राहिलेल्या ‘फ्रायडेज फॉर फ्युचर’ या चळवळीने मुंबईतही मुहूर्तमेढ रोवली आहे. या चळवळीअंतर्गत यापूर्वी वांद्रे, मरिन ड्राइव्ह, दादर येथे पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करण्यात येत आहे. आता ही चळवळ मुंबईसह ठाण्यातही अधिकाधिक जोर धरत आहे.कार्बन उत्सर्जनामुळे पृथ्वी तापत आहे. या तापमानवाढीचे दुष्परिणाम हवामान बदलाच्या रूपाने दिसू लागले आहेत. तापमानवाढ आणि हवामान बदल रोखण्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करावे लागेल.काय म्हणतो जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल?देशातील १२ महत्त्वाच्या शहरांपैकी ११ शहरांतील हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण अधिक आहे.दरवर्षी वायुप्रदूषणामुळे १२ लाख लोकांचा मृत्यू होत आहे.मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. बिझनेस हब म्हणून ओळख असलेले वांद्रे-कुर्ला संकुल अधिकाधिक प्रदूषित नोंद होत आहे. अंधेरी, चेंबूर आणि माझगावसारखे परिसरही प्रदूषणाच्या यादीत नोंदविले जात आहेत. नवी मुंबईतल्या प्रदूषणातही वाढ होत आहे.