मुंबई : मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला मुंबईत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेकडो मराठा कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. कोणत्याही हिंसक घटनेविना बहुतेक बाजारपेठा शाळा व दुकाने बंद असल्याने मुंबई ठप्प झाल्याचे चित्र गुरुवारी पाहायला मिळाले.वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सकाळी तीन तास ठिय्या आंदोलन करत मराठा कार्यकर्त्यांनी ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा दिला. या वेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाची मागणी लावून धरण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर काही शाळांनी गुरुवारी सुटी जाहीर केली होती, तर बहुतेक पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवल्याने शाळांमध्ये ५० टक्क्यांहून कमी हजेरी दिसून आली. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांतही विद्यार्थ्यांनी दांडी मारल्याचे चित्र होते. शहरातील राज्य बोर्डाच्या बहुतांश शाळा बुधवारी चालू राहिल्या, मात्र इतर बोर्डाच्या अनेक खासगी शाळा सुरक्षेच्या कारणासाठी बंद होत्या. एकूणच दिवसभरात शाळा आणि महाविद्यालये बंदला मुंबईआणि उपनगरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला.भायखळा, कॉटनग्रीन, दादर, कांदिवली, कुर्ला या ठिकाणी दुकाने बंद ठेवण्यात आली. सायनमध्ये रॅली काढून मराठा कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध नोंदवला. तर घोडपदेवमध्ये कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.>दादरचे फूल-भाजी मार्केट बंदमराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा देत दादरच्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवल्याचे गुरुवारी पाहायला मिळाले. दादर स्थानकाला लागून असलेली भाजी मंडई आणि फूल मार्केटमधील दुकाने सकाळपासून बंद होती. परिणामी, सकाळच्या वेळेत गजबजाट असणाºया दादरमध्ये गुरुवारी सकाळी मात्र शुकशुकाट होता.मुंबईतील दादरची भाजी मंडई ही नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटनंतरची सर्वात महत्त्वाची भाजी मंडई आहे. वसई-विरारपासून ते कल्याण-डोंबिवलीपर्यंतचे अनेक छोटे-मोठे भाजी विक्रेते दररोज भल्या पहाटेच भाजी घेण्यासाठी दादरमध्ये गर्दी करत असतात.एरवी दररोज सकाळी ५० ते ६० भाज्यांचे ट्रक दादर मार्केटमध्ये येतात. मात्र गुरुवारी दादर भागात भाज्यांचा एकही ट्रक आला नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीच्या पाठिंब्यासाठी स्वत:च दुकाने बंद ठेवल्याची माहिती येथील भाजी विक्रेत्यांनी दिली.>भाजी, फळांची पुरेशी रसदबंदमुळे शेतकºयांनी वाशी येथील घाऊक बाजारात भाजीमाल पाठवला नसल्याची माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शंकर पिंगळे यांनी दिली. या बाजारातून संपूर्ण मुंबई शहर आणि उपनगराला भाजीपुरवठा होत असतो.मात्र बाजारपेठ बंद असल्याने गुरुवारी होणारा भाजी पुरवठा बंद होता. दरम्यान, शुक्रवारी नेहमीप्रमाणे भाजीपुरवठा होणार असल्याने मुंबईला भाजीचा तुटवडा जाणवणार नाही. वाशी घाऊक बाजारपेठेत दररोज ५०० ते ५५० गाड्यांमधून भाजीपुरवठा केला जातो. मात्र गुरुवारी पुरवठा झाला नसल्याने बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्याचे पिंगळे यांनी सांगितले.>विद्यार्थ्यांना स्कूल बसचा दिलासाकेंद्रीय बोर्डाच्या तसेचखासगी शाळांनी सुरक्षेच्याकारणासाठी शाळा बंद ठेवल्या, तर काही शाळांत चाचणी परीक्षा सुरू असल्याने त्या शाळा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. काही शाळा सुरू असल्या, तरी तेथे विद्यार्थ्यांची तुरळक उपस्थिती दिसून आली.
>घाटकोपरमध्येठिय्या आंदोलनघाटकोपर पश्चिमेकडील भागात सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले. घाटकोपर पश्चिमेकडील भटवाडी येथे सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते सकाळी ९ वाजल्यापासून मोठ्या संख्येने जमले होते. दुपारी २ वाजेदरम्यान ठिय्या आंदोलनचा शेवट करून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.>कुर्ल्यात तरुण, महिला रस्त्यावरकुर्ल्यामध्ये गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी १० वाजल्यापासून मराठा कार्यकर्ते हाती भगवा झेंडा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत रस्त्यावर उतरले होते.कुर्ल्यामधील सर्वेश्वर मंदिर येथे आंदोलनात मृत्यू पावलेल्या आंदोलकांना श्रद्धांजली वाहून मराठा कार्यकर्त्यांनी मोर्चाची सुरुवात केली. मेजर कौस्तुभ राणे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.कुर्ला स्थानक पश्चिम, लालबहाद्दूर शास्त्री मार्ग येथून मोर्चा वांद्रे-कुर्ला संकुल येथे धडकला. कुर्ला मोर्चातील काही बांधव वांद्रे पूर्वेकडील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मोर्चात सहभागी झाले. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कुर्ल्यातील सर्व दुकाने बंद असल्याने कडकडीत बंद पाळण्यात आला. वाहतुकीवर मात्र बंदचा कोणताही परिणाम दिसला नाही.>प्रवेशाविनाच परतले विद्यार्थीअकरावी प्रवेश प्रक्रियेलाही दोन दिवसांची मुदतवाढ दिल्याने अनेक कनिष्ठ महाविद्यालये बुधवारी सुरू होती. तर काही महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रवेशासाठी गेलेल्या काही विद्यार्थी व पालकांना प्रवेशाविनाच परतावे लागले.>चेंबूर भागात मात्रसर्वकाही सुरळीतमराठा समाजाने केलेल्या महाराष्ट्र बंदचा कोणताही फटका चेंबूर आणि आसपासच्या परिसरात दिसून आला नाही. चेंबूरमधील सर्व दुकाने सकाळपासून उघडी होती. चेंबूर नाका, देवनार, मानखुर्द, गोवंडी या परिसरात सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. सायन-पनवेल महामार्गावरही सकाळपासून कोणतीही अडचण न येता वाहतूक सुरळीत होती.>मुलुंडमध्ये बंदला थंड प्रतिसादमुलुंड पश्चिम आणि पूर्व दोन्ही बाजूला दैनंदिन व्यवहार सुरू असल्याचे दिसले. मुलुंड पश्चिमेकडील भागात दुकाने, रिक्षा आणि बस सेवा सुरळीत सुरू होती. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले होते. एकंदरीतच मुलुंडमध्ये बंदला थंड प्रतिसाद मिळाला.>भांडुप परिसरात जनजीवन सुरळीतभांडुप, नाहूर परिसरातील जनजीवन सुरळीत होते. मराठा समाजाचे प्रमुख कार्यकर्ते वांद्रे येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यामुळे या ठिकाणी कोणतेही आंदोलन करण्यात आले नाही. नाहूर रेल्वे स्थानकाजवळून पदयात्रा काढण्याचा प्रयत्न काही कार्यकर्त्यांनी केला. मात्र त्या पदयात्रेसाठी परवानगी नसल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या भागात कोणताही अनुचित प्रसंग घडला नसल्याची माहिती भांडुप विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त ए.टी. सोंडे यांनी दिली.