हलव्याचे दागिनेही झाले आता ट्रेंडी
By admin | Published: January 14, 2016 03:39 AM2016-01-14T03:39:02+5:302016-01-14T03:39:02+5:30
मकरसंक्रांतीचा सण म्हणजे गोडधोड पदार्थांची रेलचेल. या दिवशी गोडधोड हलव्याचे दागिनेही आवर्जून घातले जातात. मात्र मध्यंतरीच्या काळात काहीशी पुसट होत चाललेली ही परंपरा
मुंबई : मकरसंक्रांतीचा सण म्हणजे गोडधोड पदार्थांची रेलचेल. या दिवशी गोडधोड हलव्याचे दागिनेही आवर्जून घातले जातात. मात्र मध्यंतरीच्या काळात काहीशी पुसट होत चाललेली ही परंपरा पुन्हा नव्याने अवतरली आहे. अनेकांनी या गोड दागिन्यांना पसंती दिल्यामुळे यंदा बाजारात विविध प्रकारचे हलव्याचे दागिने पाहायला मिळत आहेत.
मकरसंक्रांत उद्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे बाजारात तिळाचे लाडू, फुटाण्यांसोबत हलव्याचे दागिनेही पाहायला मिळत आहेत. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हलव्याचे दागिने घातले जातात व खरेदी केले जातात. यात नवविवाहित जोडपी, लहान मुले हे दागिने घालून फोटो सेशनचा आनंद लुटतात. परंतु हलव्याचे दागिने घालण्याच्या प्रथेनुसार आता बहुतांश लोक हलव्याचे दागिने घालतात. काळ््या कपड्यांवर हलव्याचे दागिने सोन्याहूनही पिवळे दिसतात. यापूर्वी पुठ्ठ्यावर नुसतेच फुटाणे रचून दागिने तयार केले जात असत. त्यामुळे त्याला पाहिजे तसा खऱ्या दागिन्यांचा नाजूकपणा येत नव्हता. आता अगदी खऱ्याखुऱ्या दागिन्यांहून अधिक कलाकुसर केलेले दागिने दादर, गिरगाव आणि उपनगरांत पाहायला मिळत आहेत. कोरीव काम केलेले हे दागिने आता काळानुसार ट्रेंडी झाल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे दागिने बनविणाऱ्यांनीही याबाबतच्या नव्या फॅशनला फॉलो केले असून, त्यामुळे अमराठी लोकही या दागिन्यांची खरेदी करीत आहेत. अगदी पारंपरिक दागिन्यांसोबत यात अनेक नव्या प्रकारातील दागिन्यांची भर पडली आहे. यात विविध चोकर सेट, शाही हार, तीन पदरी मंगळसूत्र अशा दागिन्यांचा समावेश दुकानदारांनी आवर्जून केला आहे. या दागिन्यांना अजून उठाव आणण्यासाठी दागिन्यांना खाण्याच्या रंगाने रंगवून सजवण्यात आले आहे.
लहानग्यांसाठी दागिने
मुलांसाठी कृष्णाचा तर मुलींसाठी राधाच्या दागिन्यांचा सेट आहे. यात मुकुट, हार, कमरपट्टा, पायातले तोडे, कडे, डूल यांचा समावेश आहे.
महिलांसाठी : मुकुट, अंगठी, बांगड्या, कमरपट्टा, नथ, जोडवी, पैंजण, बाजुबंद, मंगळसूत्र, केसांसाठी वेणी, कानातल्यांचे विविध प्रकार आणि झुमके