भूमी अभिलेखच्या कर्मचा-यांचे आंदोलन
By admin | Published: January 29, 2015 10:38 PM2015-01-29T22:38:19+5:302015-01-29T22:38:19+5:30
राज्यातील भूमी अभिलेख कार्यालयीन कर्मचा-यांनी २७ जानेवारी पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
पेण : राज्यातील भूमी अभिलेख कार्यालयीन कर्मचा-यांनी २७ जानेवारी पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्याचा फटका सामान्य जनतेला बसत असून, पेणच्या भूमी अभिलेख कार्यालय परिसरात शुकशुकाट दिसत आहे. एरव्ही पेण तहसीलच्या लगत असलेल्या कार्यालयात भूमापनासंबंधित अनेक कामे करण्यासाठी येणारे शेकडो नागरिकांना कर्मचारीवर्गाच्या काम बंद आंदोलनामुळे गेले तीन चार दिवस रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. कार्यालयीन कर्मचारीवर्गाच्या काम बंद आंदोलनाचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.
महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना, संलग्न राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी बेमुदत काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले असून जोपर्यंत भूमी अभिलेख कार्यालयातील रिक्त पदे भरण्यात येत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार असे संघटना पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मागण्यांचे पत्रक शासन दरबारी प्रलंबित असून प्रशासन गतिमान व्हावे, नागरिकांची कामे त्वरेने व्हावी यासाठी रिक्त पदांचा कोटा शासनाने त्वरित भरावा व कर्मचारीवर्गावरील ताण कमी करावा, असे संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. याचबरोबर इतर मागण्यांमध्ये तांत्रिक वेतनश्रेणी, तांत्रिक दर्जा व तांत्रिक वेतनश्रेणी मिळावी, नागरीकरणाच्या प्रमाणामध्ये नगरभूमापनाची कार्यालये सुरू करावी. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नगरभूमापन कार्यालय सुरू करावे.
मोजणी प्रकरणांची संख्या १५ प्रकरणावरून १२ प्रकरणापर्यंत व्हावी. नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यात जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख आस्थापना तात्काळ मंजूर करावी. वर्ग ३ व वर्ग २ मध्ये पदोन्नती देताना आहे त्याच विभागानुसार पदोन्नती देण्यात यावी आणि राज्यातील रिक्त पदांचा कोटा तात्काळ भरण्यात यावा. राज्य संघटना अध्यक्ष रमेश सरकटे यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा संघटना अध्यक्ष एस.एस. अहिरे, कार्याध्यक्ष तानाजी राऊत, उपाध्यक्ष कांबळे, सरचिटणीस शैलेश जाधव, या जिल्हा कार्यकारिणीने याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांना दिले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पेण भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी एस.टी. घुले, सहाय्यक आर.बी. लाघे, शिरस्तेदार व्ही.जी. चांदोलकर, भूमापक निखिल पारकर आदि कर्मचारी व अधिकारी आंदोलनात सहभागी असल्याने भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.