मोनोरेल स्थानकाला ‘विठ्ठल मंदिर वडाळा’ या नामकरणासाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 02:11 AM2019-07-12T02:11:26+5:302019-07-12T02:11:57+5:30
वडाळ्यात तुकाराम महाराजांनी प्राणप्रतिष्ठा केलेले शेकडो वर्षे जुने विठ्ठल मंदिर आहे. या मंदिराची ख्याती प्रतिपंढरपूर अशीच आहे.
मुंबई : बिल्डरांना फायदा व्हावा, या हेतूनेच वारंवार मागणी करूनही मुंबई मोनोरेलच्या दादर पूर्व स्थानकाचे विठ्ठल मंदिर वडाळा, असे नामकरण करण्यात येत नसल्याचा आरोप करत गुरुवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनीच या स्थानकाचे प्रतीकात्मक नामकरण केले.
प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनादरम्यान या स्थानकावर सर्वत्र ‘विठ्ठल मंदिर वडाळा’ असे नामफलक लावण्यात आले. मोनोरेलचे हे स्थानक वडाळ्यात आहे. या स्थानकाचा पिन कोड आणि वडाळ्याचा पिन कोड एकच आहे. दादरशी याचा काहीही संबंध नाही. या परिसरात बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना हा परिसर दादर पूर्व असल्याचे सांगून अधिक किमतीने जागा विकता यावी, या एकमेव कारणास्तव या स्थानकाला दादर पूर्व हेच नाव देण्याचा घाट एमएमआरडीएने घातला आहे, असा आरोप वाघमारे यांनी केला.
वडाळ्यात तुकाराम महाराजांनी प्राणप्रतिष्ठा केलेले शेकडो वर्षे जुने विठ्ठल मंदिर आहे. या मंदिराची ख्याती प्रतिपंढरपूर अशीच आहे. या पार्श्वभूमीवर मोनोरेलच्या स्थानकाला ‘विठ्ठल मंदिर वडाळा’ हे नाव देण्याची मागणी सातत्याने केली जाते आहे. केवळ बिल्डरांच्या हितास्तव या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. आम्ही स्वत:च या स्थानकाला ‘विठ्ठल मंदिर वडाळा’ असे नाव दिल्याचे वाघमारे यांनी स्पष्ट केले.
श्री विठ्ठल मंदिर यात्रेनिमित्त वाहतूक मार्गात बदल
वडाळा येथील श्री विठ्ठल मंदिर यात्रेनिमित्त ११ जुलै रोजी सायंकाळी ६.०० पासून १३ जुलै रोजी सकाळी ८.०० वाजेपर्यंत तात्पुरत्या कालावधीकरिता वाहतूक निर्बंध घालण्यात आले आहेत. दादर टीटी जंक्शन ते कात्रक रोड जंक्शनपर्यंतचा रोड वाहतुकीस बंद राहील, टिळक ब्रिजवरून येणारी वाहतूक खोदादाद/दादर टी. टी. सर्कलपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर उत्तर वाहिनीने रुईया जंक्शनमार्गे वळविण्यात आली आहे.कात्रक रोड हा डेव्हिड बैरेटो सर्कलपासून जी.डी. आंबेकर मार्ग व टिळकरोड जंक्शनपर्यंत वाहतुकीस बंद राहणार आहे, असे त्यांनी सांगितले. जी.डी. आंबेकर रोड हा वाहतुकीसाठी बंद राहील, सहकारनगर गल्लीपासून टिळक रोड विस्तारित हा (पूर्वेकडून पश्चिमेकडे) वाहतुकीकरिता बंद राहणार आहे. लेडी जहाँगीर रोड जंक्शनपासून ते कात्रक रोड जंक्शनपर्यंत पारशी कॉलनी नं. १३ व रोड नं. १४ हे मार्ग वाहतुकीस बंद करण्यात येणार आहेत. मंचेरजी जोशी मार्ग जंक्शनपासून ते दिनशाँ मार्ग हा वाहतुकीस बंद आहे़
गिरणी कामगार काढणार आज वडाळ्यापर्यंत दिंडी
रखडलेल्या गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर सरकारला सुबुद्धी द्या, या मागणीसाठी पांडुरंगाला साकडे घालण्यासाठी शुक्रवारी १२ जुलैला आषाढी एकादिशीदिनी सकाळी साडेदहा वाजता गिरणी कामगार दिंडी काढणार आहेत. ही दिंडी ना. म. जोशी मार्गावरील महाराष्ट्र हायस्कूलच्या मैदानावरून वडाळा येथील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाºया विठ्ठल मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे.