शाळा कृती समितीचे आंदोलन तात्पुरते स्थगित
By admin | Published: November 26, 2014 02:09 AM2014-11-26T02:09:50+5:302014-11-26T02:09:50+5:30
शाळांची फेरतपासणी सुरु झाल्याने या विरोधात महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने मंगळवारी आझाद मैदानात आंदोलन केले.
Next
मुंबई : कायम शब्द वगळलेल्या आणि अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांची फेरतपासणी सुरु झाल्याने या विरोधात महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने मंगळवारी आझाद मैदानात आंदोलन केले. शिक्षण मंत्र्यांनी आंदोलकांना शाळांच्या अनुदानाबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने समितीने आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. दरम्यान, येत्या काही दिवसात अनुदानाबाबत निर्णय न झाल्यास हिवाळी अधिवेशनावर धडक देण्याचा इशारा समितीचे मुंबई विभागीय अध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी दिला आहे.
कायम विनाअनुदानित शाळांचे मुल्यांकन करुन शाळांना अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला. मुल्यांकनानुसार अनुदानास पात्र शाळांना अनुदान देण्याबाबत वित्त विभागाकडून निधी उपलब्ध झालेला नाही. अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांचे पुन्हे फेरमुल्यांकन करण्यात येत असल्याच्या विरोधात शाळा कृती समितीने आंदोलन छेडले आहे. समितीच्या शिष्टमंडळाने शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन मागण्यांबाबत चर्चा केली. यावेळी अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांसाठी निधी उपलब्ध झाल्यास तो तात्काळ शाळांना देण्यात येईल,असे आश्वासन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे समितीने छेडलेलेआंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. (प्रतिनिधी)