Join us  

वेमुलासाठी आंदोलन

By admin | Published: February 04, 2016 2:47 AM

हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुला याला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या निषेधार्थ मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या भारिप-बहुजन महासंघाचे

मुंबई : हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुला याला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या निषेधार्थ मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, लोकभारतीचे आमदार कपिल पाटील आणि श्याम सोनार यांच्यासह मोर्चात सहभागी झालेल्या १२०० ते १५०० कार्यकर्त्यांविरुद्ध आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वेमुला आत्महत्येप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करून रोहितच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी मुंबईतील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या जस्टिस फॉर रोहित कमिटीतर्फे सोमवारी हा मोर्चा काढला होता. मंत्रालयाच्या दिशेने मोर्चा नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनससमोर रस्त्यावर अडवल्याने आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच बसून निदर्शने केली. या ठिकाणी एक सभासुद्धा घेण्यात आली. त्यामुळे फोर्ट, कुलाबा ते भायखळ्यापर्यंतची वाहतूक तब्बल दोन तास ठप्प झाली होती. कायदेशीररीत्या परवानगी न घेता मोर्चा काढण्यात आला. मोर्चात रस्त्यांवरच निदर्शने केल्याने वाहतुकीचा खोळंबा होऊन याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागला. बेकायदेशीर जमाव गोळा करून रास्ता रोको केल्याप्रकरणी आंदोलनात सहभागी झालेल्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)