मुंबई : केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर अनेक कंपन्यांच्या मालकांनी एप्रिल व मे महिन्याचे हजारो कामगारांना अद्याप वेतन न दिल्यामुळे कामगारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. तेव्हा केंद्र व राज्य सरकारने स्वतःच्या आर्थिक बजेटमधून किंवा कामगार विमा योजनेच्या अटल विमा योजनेअंतर्गत इएसआयच्या निधीतून वेतन द्यावे, अशी मागणी हिंद मजदूर सभा व इतर कामगार संघटनांनी केली आहे. कामगारांना लॉकडाऊन कालावधीचे वेतन त्वरित न दिल्यास सर्व कामगार संघटना आंदोलन करतील, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे सरचिटणीस संजय वढावकर यांनी सरकारला दिला आहे.
केंद्र सरकारने 24 मार्च पासून लॉकडाऊन जाहीर केले आहे. मालकांनी विनाकपात वेतन द्यावे व कामगार कपात करू नये असे आदेश 29 मार्च रोजी सरकारने दिले होते, मात्र देशातील व राज्यातील लाखो कंपनी मालकांनी कोट्यावधी कामगारांना एप्रिल व मे महिन्या चे वेतन अद्याप दिलेले नाही. केंद्र सरकारच्या 20 लाखाच्या पॅकेजमध्ये कामगारांना आर्थिक मदत देण्याची कोणतीही योजना जाहीर करण्यात आलेली केली नाही, मालकांनी कामगारांना वेळेवर वेतन दिले नाही, केंद्र सरकारने लॉक डाऊन जाहीर केले होते, तेंव्हा आता केंद्र सरकारने आपल्या तिजोरीतून कामगारांना वेतन द्यावे, अथवा कामगार विमा योजनेअंतर्गत अटल विमा कल्याण योजनेच्या निधीतून लॉक डाऊन कालावधीचा पगार कामगारांना देण्याचा निर्णय सरकारने घ्यावा, अशी मागणी कामगार संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. अशी माहिती हिंद मजदूर सभा, महाराष्ट्रचे प्रसिद्धिप्रमुख मारुती विश्वासराव यांनी दिली.