प्रक्रिया अंतिम टप्प्यात; येत्या दाेन दिवसांत हाेणार सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पालिकेनंतर आता शहर, उपनगरातील खासगी रुग्णालयांमध्येही दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला वेग येतो आहे. त्यामुळे आता लसीकरणाचे व्यवस्थापन करण्यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये युद्धपातळीवर हालचाली सुरू आहेत. काही खासगी रुग्णालयांमध्ये पालिकेकडून तपासणी होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, या तपासणीअंती सर्व निकष पूर्ण केल्याची प्रशासनाकडून खात्री करून घेण्यात येत आहे.
लसीकरणासाठी पूर्णपणे तयार आहोत, रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याची परवानगी आहे. प्रोटोकॉल सेट केलेले आहेत, रुग्णालयातील मनुष्यबळही प्रशिक्षित आहे. आम्ही लाभार्थींना लसीकरणासाठी पूर्णपणे तयार आहोत. सरकारकडून लस घेणार आहोत. लाभार्थींकडून २५० रुपये आकारून त्यांचे लसीकरण केले जाईल. रुग्णालयाच्या क्षमतेच्या ५० टक्के लस ही ॲपद्वारे नोंदणी केलेल्या लाभार्थींना देण्यात येईल. तसेच ५० टक्के लस वॉक इन येणाऱ्यांना दिली जाईल, असे सीईओ गौतम खन्ना म्हणाले.
वॉक इन येणाऱ्यांना निश्चित वेळ दिली जाईल तसेच सुरक्षित अंतर ठेवले जाईल. सरकारकडून रुग्णालयाला कोविशिल्ड लस पुरवणार असल्याचे सांगितले गेले आहे. त्यामुळे आम्ही लाभार्थींना कोविशिल्ड लस देणार आहोत. बुधवारी रात्री लसीकरणाची परवानगी मिळाली असून, राज्याकडून काही मार्गदर्शक तत्त्वे येणे बाकी आहे. ती आल्यानंतर येत्या दोन दिवसांत लसीकरणाला सुरुवात होईल, अशी माहिती पी.डी. हिंदुजा रुग्णालयाचे सीईओ गौतम खन्ना यांनी दिली.
* लस घेतल्यानंतरही नियमांचे पालन गरजेचे!
खासगी, सरकारी रुग्णालयांमध्ये समन्वय साधणारे डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले की, अजूनही काही रुग्णालयांमध्ये लसीकरण व्यवस्थापनाविषयी निकषपूर्तता होणे बाकी आहे. त्यानंतर लसीकरणाचा वेग वाढविता येईल. मागील काही दिवसांत वाढलेला कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी या टप्प्यातील लसीकरणाचे महत्त्वाचे योगदान आहे. मात्र लस घेतल्यानंतरही सामान्यांनी मास्कचा वापर, स्वच्छता आणि शारीरिक अंतर या नियमांचे पालन करणे सक्तीचे आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे.