जीपीएस आधारित मीटर रिक्षा-टॅक्सींमध्ये लावण्यासाठी हालचाली सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:07 AM2021-03-16T04:07:35+5:302021-03-16T04:07:35+5:30
मुंबई : मुंबईसह आसपासच्या परिसरात सोमवार, १ मार्चपासून रिक्षा-टॅक्सीचे भाडे तीन रुपयांनी वाढले आहे. रिक्षा-टॅक्सी मीटरचे कॅलिब्रेशन अर्थात ...
मुंबई : मुंबईसह आसपासच्या परिसरात सोमवार, १ मार्चपासून रिक्षा-टॅक्सीचे भाडे तीन रुपयांनी वाढले आहे. रिक्षा-टॅक्सी मीटरचे कॅलिब्रेशन अर्थात मीटरमध्ये बदल करण्यासाठी मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मीटरमध्ये सुधारित भाडे लागू करण्याकरिता होणारा विलंब लक्षात घेता आता जीपीएस आधारित मीटर रिक्षा-टॅक्सींमध्ये लावण्यासाठी परिवहन आयुक्तालयांकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
रिक्षा-टॅक्सीच्या सुधारित भाडेवाढीसाठी मीटरमध्ये आवश्यक बदल करण्याकरिता हजार रुपयांचा खर्च चालकांवर येत आहे. याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करून अनेक आंदोलने झाली आहेत. यावर उपाय म्हणून दिल्लीतील रिक्षा-टॅक्सीत यशस्वी ठरलेली जीपीएस मीटर मुंबईत सुरू करण्यात येणार आहे. जीपीएस मीटरसाठी तूर्तास कोणताही निर्णय झालेला किंवा प्रस्ताव नाही. सध्या दिल्लीमध्ये हे मीटर सुरू आहेत. मुंबईत हे मीटर लागू करण्यासाठी संबंधित कंपन्यांशी बैठक करण्यात येईल. त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मीटर अद्यावत करण्याची डोकेदुखी टाळण्यासाठी महाराष्ट्रात परिवहन विभागाकडून भविष्यात ही यंत्रणा राबविण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे खलबते सुरू असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.
बॉक्स
जीपीएस मीटर लावल्यानंतर त्यामध्ये फेरफार करता येत नाही. ग्राहकांना किती अंतर पार केले आणि त्याची अचूक माहिती मिळते. तसेच भाडेवाढ झाल्यानंतर वारंवार मीटर अद्यावत करण्याची गरज नाही. ऑनलाइनसुद्धा मीटर अद्यावत करता येते, असे परिवहन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.