Join us

राष्ट्रीय महाविकास आघाडीसाठी लवकरच हालचाली : संजय राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 4:06 AM

राष्ट्रीय महाविकास आघाडीसाठी लवकरच हालचालीसंजय राऊत; शिवसेनेसारखे काम जमले नाही म्हणूनच इतर राज्यांत चिता पेटल्यालोकमत न्यूज नेटवर्क...

राष्ट्रीय महाविकास आघाडीसाठी लवकरच हालचाली

संजय राऊत; शिवसेनेसारखे काम जमले नाही म्हणूनच इतर राज्यांत चिता पेटल्या

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशाला एका उत्तम विरोधी आघाडीची गरज आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी ही आदर्श आघाडी आहे. राष्ट्रीय पातळीवरही अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती सध्या ठीक नाही, पण लवकरच यासंदर्भात हालचाली सुरू होतील, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी रविवारी दिली.

संजय राऊत यांनी शनिवारी शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी झालेल्या चर्चेची माहिती राऊत यांनी रविवारी माध्यमांना दिली. जशी महाराष्ट्रात महाविकास आघाडी काम करत आहे, अशाचप्रकारे आघाडी आपण देशात उभी करू शकतो का, यासंदर्भात शनिवारी शरद पवारांसोबत चर्चा झाल्याचे राऊत म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी जी मुसंडी मारली ती जबरदस्त आहे, पण भविष्यात देशात एक आघाडी निर्माण व्हावी, ही सगळ्यांची इच्छा आहे. त्यासाठी नवीन नेतृत्वच हवे असे नाही, पण एकत्र बसून ठरवायला हवे, असे ते म्हणाले.

आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून शिवसेनेने तीन कोविड सेंटर उभारले आहेत. सरकारला समांतर अशी कोविड सेंटर व यंत्रणा राजकीय कार्यकर्तेही उभी करत आहेत. त्यामुळे सरकारचा भार कमी होत आहे. हे इतर राज्यांमध्ये झाले नाही. आता अनेक संघटना, संस्था काम करतात, पण त्यांना शिवसेनेसारखे काम करता आले नाही. आज अनेक राज्यांमध्ये ज्या चिता पेटलेल्या दिसत आहेत, कब्रस्तानात जागा नाही हे चित्र जगात गेले आहे, त्याचे कारण हेच आहे, असे राऊत म्हणाले.

* आघाडीचा आत्मा काँग्रेस पक्ष आहे!

प्रत्येकाला वाटते मीच नेता आहे, पण तसे नाही, आघाडी अशी निर्माण होत नाही. भविष्यात विरोधी पक्षाची भक्कम आघाडी उभी करावी आणि एक आव्हान उभे करावे, अशी सगळ्यांची इच्छा आहे. या आघाडीचा आत्मा नक्कीच काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेस पक्षाशिवाय कोणतीही आघाडी होऊ शकणार नाही. अलीकडच्या निवडणुकांत काँग्रेसला यश मिळाले असले तरी काँग्रेसने अजून मुसंडी मारणे जास्त गरजेचे आहे, असे राऊत यांनी सांगितले.

----------------------