संजय लीला भन्साळींचा 'पद्मावती' सिनेमा झाला लीक?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 02:01 PM2017-11-30T14:01:08+5:302017-11-30T15:14:12+5:30
संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित व बहुप्रतिक्षित 'पद्मावती' सिनेमा रिलीजपूर्वीच वादात अडकला आहे.
मुंबई - संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित व बहुप्रतिक्षित 'पद्मावती' सिनेमा रिलीजपूर्वीच वादात अडकला आहे. राजस्थानच्या करणी सेनेनं सिनेमाला तीव्र विरोध दर्शवत पद्मावती सिनेमावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. वाढता विरोध पाहता सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. दरम्यान, सिनेमाला आतापर्यंत सेन्सॉर बोर्डकडूनही हिरवा कंदील दाखवण्यात आलेला नाही. निर्मात्यांनी सिनेमाच्या प्रदर्शनाची नवीन तारीखदेखील जाहीर केलेली नाही. यामुळे सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या रसिकांची निराशा झाली आहे.
एकूणच पद्मावती सिनेमामागील वाद थांबता थांबत नाहीयत. मात्र, या सर्व वादाचा काही जण फायदा उचलण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. पद्मावतीच्या नावावर बोगस व्हिडीओला सिनेमा असल्याचं सांगत यू-ट्युबवर अपलोड करण्यात येत आहे. हे व्हिडीओ लोकं मोठ्या प्रमाणात पाहत आहेत. या बनावट व्हिडीओमुळे पद्मावती सिनेमा लीक झाल्याचे इंटरनेट युझर्संना वाटत आहे.
या बोगस व्हिडीओंमुळे पद्मावती सिनेमाची निगेटीव्ह पब्लिसिटी होत आहे. खरंतर पद्मावती सिनेमा अद्यापपर्यंत ऑनलाइन उपलब्ध झालेला नाही. दरम्यान, तरीही सिनेमा प्रदर्शनापूर्वीच लीक होऊ नये, यासाठी निर्मात्यांनी सावध राहायला हवं. यापूर्वी मोहल्ला अस्सी, ग्रेट ग्रँड मस्ती, उडता पंजाब आणि गोलमाल यासारखे सिनेमे प्रदर्शनापूर्वी लीक झाले होते.
नितीश कुमार 'पद्मावती'च्या वादात
‘पद्मावती’ या सिनेमास सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळून तो सिनेमागृहांत झळकण्याआधीच त्याच्या विरोधात वक्तव्ये करण्याच्या वरिष्ठ पदांवरील राजकीय नेत्यांच्या प्रवृत्तीवर एकीकडे सर्वोच्च न्यायालाय मंगळवारी नाराजी व्यक्त करत असतानाच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याची भूमिका घेतली.
पाटण्यात नितीश कुमार म्हणाले की, या सिनेमावरून वाद उत्पन्न झाले आहेत. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी त्यावर भूमिका स्पष्ट करेपर्यंत ‘पद्मावती’ बिहारमध्ये दाखवू दिला जाणार नाही. सिनेमात राणी ‘पद्मावती’ला नृत्य करताना दाखविण्यासही त्यांनी आक्षेप घेतला.
सुप्रीम कोर्टाची नाराजी
मंत्री व मुख्यमंत्र्यांसारख्या जबाबदार व्यक्तींच्या वक्तव्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांचे मन निष्कारण कलुषित होऊ शकते. त्यामुळे या मंडळींनी वाचाळपणा करण्याआधी कायद्याची चौकट आपल्यालाही लागू आहे, याचे भान ठेवायला हवे, अशी नाराजी व्यक्त करत सुप्रीम कोर्टाने पद्मावतीबद्दलची याचिका फेटाळली
Get Latest Marathi News, Mumbai News, Pune News, Maharashtra News Here on Lokmat.com