समीर कर्णुक, मुंबई पनवेलवरून कुर्ल्याच्या दिशेने जाणाऱ्या चालत्या ट्रेनवर एका अज्ञात इसमाने रॉड फेकून मारल्याची घटना बुधवारी रात्री गोवंडी येथे घडली. यामध्ये रात्रपाळीसाठी कामावर जात असलेली एक महिला कॉन्स्टेबल गंभीररीत्या जखमी झाली, तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून गोवंडी आणि मानखुर्द रेल्वे स्थानकांदरम्यान प्रवाशांवर दगडफेक होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशाच प्रकारे भांडुप पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हर्षा जाधव (२३) ही महिला पोलीस शिपाई नेहमीप्रमाणे रात्रपाळीसाठी निघाल्या. मानखुर्दवरून त्यांनी लोकल पकडली. बुधवारी सव्वा सातच्या सुमारास गोवंडी रेल्वेस्थानक येण्याच्या काही अंतरावरच अचानक बाहेरून एक लोखंडी रॉड त्यांच्या दिशेने आला. हा रॉड जाधव यांच्या तोंडावरच आदळला. त्यामुळे या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. काही क्षणांतच गाडी गोवंडी रेल्वे स्थानकावर आली. मात्र मदतीसाठी कोणीच पुढे न धावल्याने त्यांना रेल्वे पोलिसांच्या मदतीने जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णवाहिका गेल्या कुठे?रेल्वे अपघात आणि इतर घटनाच्या वेळेस रुग्णांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी शासनाने प्रत्येक रेल्वे स्थानक परिसरात रुग्णवाहिकांची सोय केली आहे. मात्र बुधवारी झालेल्या या घटनेनंतर एकही रुग्णवाहिका या ठिकाणी उपलब्ध नव्हती. जाधव यांना चालताही येत नव्हते. मात्र नाइलाजास्तव पोलीस शिपायांनी त्यांना रिक्षामध्ये घालून राजावाडी रुग्णालयात नेले. कुर्ल्यानंतर गोवंडीत घटना वाढल्यावर्षभरापूर्वी सायन आणि कुर्ला रेल्वे स्थानकांदरम्यान मोठ्या प्रमाणात प्रवाशांवर हल्ले होत होते. झाडीमध्ये दडून बसलेले काही भुरटे चोर दरवाज्यावर असलेल्या प्रवाशांच्या हातावर काठीने प्रहार करून त्यांच्या हातामधील मोबाइल खाली पाडायचे. त्यानंतर पळ काढत होते. मात्र कुर्ला रेल्वे पोलिसांनी याची गंभीर दखल घेत या ठिकाणी बंदोबस्त वाढवला. अशाच प्रकारे गोवंडी आणि मानखुर्द परिसरातदेखील गेल्या काही दिवसांपासून घटना वाढत आहेत. त्यामुळे या ठिकाणीदेखील पोलिसांची गस्त वाढवण्याची गरज आहे. पोलिसांची हेल्पलाइन कुचकामी : संकटसमयी महिलांनी पोलिसांच्या हेल्पलाइनवर मदत मागावी, अशा सूचना नेहमी ट्रेनमध्ये लावण्यात येतात. मात्र खरोखर जेव्हा गरज असते, तेव्हा पोलीस कधीच वेळेवर उपलब्ध होत नाहीत, याचे उदाहरण कालच्या या घटनेमध्ये आले. याच महिलांच्या डब्यामध्ये काल चेंबूर येथे राहणारी रश्मी आवळे ही तरुणीदेखील प्रवास करीत होती. घटनेनंतर तिने या महिलेला सावरत मदतीसाठी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला. एका महिलेने हा कॉल घेतला. मात्र माहिती पूर्ण ऐकून न घेता या महिलेने तत्काळ फोन कट केला.
चालत्या ट्रेनमध्ये महिला कॉन्स्टेबलवर रॉडने हल्ला
By admin | Published: July 03, 2015 3:14 AM