खासदारांची अनुपस्थिती आणि सदोष आकडेवारी
By admin | Published: December 7, 2015 01:53 AM2015-12-07T01:53:27+5:302015-12-07T08:58:10+5:30
उपनगरीय रेल्वे मार्गावर होणाऱ्या अपघातांचा आढावा घेण्यासाठी रेल्वेमंत्र्यांच्या आदेशानुसार, स्थापन झालेल्या समितीची बैठक मध्य रेल्वेवर रविवारी पार पडली.
मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावर होणाऱ्या अपघातांचा आढावा घेण्यासाठी रेल्वेमंत्र्यांच्या आदेशानुसार, स्थापन झालेल्या समितीची बैठक मध्य रेल्वेवर रविवारी पार पडली. मात्र, काही खासदारांची अनुपस्थिती, रेल्वेकडून देण्यात आलेली सदोष आकडेवारी आणि अन्य सदस्यांची निराशा, यामुळे कोणताही तोडगा या बैठकीत निघाला नाही.
डोंबिवलीकर भावेश नकातेच्या मृत्यूच्या घटनेनंतर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आणि त्याची दखल रेल्वेमंत्र्यांना घेण्यास भाग पडले. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या निर्देशानुसार मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून अपघातांचा आढावा घेणाऱ्या स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आल्या.
या दोन्ही रेल्वेकडून समितीत खासदार, प्रवासी संघटना, सामाजिक संघटना व राज्य शासनाच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला. यातील मध्य रेल्वेकडून नेमण्यात आलेल्या समितीची बैठक रविवारी पार पडली. मात्र, ही बैठक चर्चेत राहिली, ती सदस्यांनी न दाखविलेली रुची आणि रेल्वेकडून सादर करण्यात आलेल्या सदोष आकडेवारीमुळे या समितीत समावेश असलेल्या भाजप खासदार पूनम महाजन यांनी बैठकीला येण्याऐवजी आपला प्रतिनिधी पाठविणे पसंत केले, तर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी बैठकीतून २0 मिनिटांतच काढता पाय घेऊन, दिल्लीला जाणे पसंत केले. बैठकीला खासदार राजन विचारे, किरीट सोमय्या, मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त ई.रवींद्रन, केतन गोराडिया व आर.नागवाणी उपस्थित होते.