Join us

... तर भस्मसात व्हाल, मोदींवरील पुस्तकाच्या वादावरुन अमोल कोल्हेंचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 20:28 IST

भाजपाच्या दिल्लीतल्या कार्यालयातून प्रकाशित करण्यात आलेलं 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' हे पुस्तक

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी केल्यामुळे राज्यात सर्वच राजकीय पक्ष आणि शिवभक्तांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या वादावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते व राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीही आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच, या पुस्तकाचा उल्लेक करताना, एखाद्या बाजारू लांगूलचालन पुस्तकाप्रमाणे हे पुस्तक असल्याचं कोल्हे यांनी म्हटलंय.   

भाजपाच्या दिल्लीतल्या कार्यालयातून प्रकाशित करण्यात आलेलं 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' हे पुस्तक अतिशय वादग्रस्त ठरलं आहे. मोदी आणि शिवरायांची तुलना करण्यात आल्यानं सर्वच स्तरातून भाजपावर टीका करण्यात येत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीनंतर मनसेनेही इशारा दिला आहे. या पुस्तकातील मोदींच्या तुलनेवरुन आमदार शिवेंद्रराजे अन् छत्रपती संभाजीराजे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. तर, उदयनराजे भोसले हेही उद्या आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यातच, अमोल कोल्हेंनी फेसबुकवरुन आपली भूमिका मांडली आहे.  

''एखाद्या बाजारू लांगूलचालन करणाऱ्या पुस्तकाविषयी प्रतिक्रिया देण्याची गरज नाही परंतु ‘काळ सोकावू नये’ म्हणून एवढंच सांगतो की दगडाला शेंदूर फासला जाताना अनेकदा पाहिला आहे पण सूर्याचं आवरण घालण्याचा प्रयत्न केला तर भस्मसात व्हाल!छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, स्वातंत्र्याची ओळख आहे, रयतेच्या राज्याचे प्रतीक आहे! ते एकमेवाद्वितीय आहेत.... कैक जन्म घेतले तरी त्यांची तुलना नाही.. हा अंगार साडेतीनशे पावणेचारशे वर्षांनंतरही महाराष्ट्राच्या मनामनात धगधगत आहे...याचं भान ठेवा ... नाहीतर जाणीव करून द्यावी लागेल!'' असे अमोल कोल्हे यांनी म्हटलंय. 

टॅग्स :आज के शिवाजी नरेंद्र मोदीडॉ अमोल कोल्हेछत्रपती शिवाजी महाराजराष्ट्रवादी काँग्रेसभाजपाउदयनराजे भोसले