Join us

"पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल, यासाठी...", अमोल कोल्हेंनी शरद पवारांसमोर सांगितली रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 5:14 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात खासदार कोल्हे बोलत होते

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचा असेल असा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात खासदार कोल्हे बोलत होते. "रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करतो तेव्हा जबाबदारी आणखी वाढते. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे स्थान वढू तुळापूरला पहिल्यांदाच जीर्णोद्धारासाठी भरघोस निधी महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिला. याचा पक्षाच्या प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे. व्हॉट्सप युनिव्हर्सिटीचे डमिन ज्या आयटी क्षेत्रातून येतात त्या आयटी क्षेत्राचा पाया आदरणीय पवार साहेबांनी घातला. म्हणून जेव्हा राष्ट्रीय पक्ष पुन्हा होऊन दाखवा, असे मेसेज व्हॉट्सपवर फिरतात तेव्हा त्यांना आवर्जून सांगा की वाघ जेव्हा झेप घेणार असतो तेव्हा तो दोन पावले मागे जातो. नंतर जो झेप घेतो तो नरडीचा घोट घेणारी झेप घेतो. ही झेप घेण्याचा निश्चय आज वर्धापन दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने करूया", असे त्यांनी नमूद केले. 

"पुढचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असला पाहिजे यासाठी आतापासूनच कंबर कसूया. यात अडथळे अनेक येतील हिंदुत्वाची गोळी घेऊन कोण आले तर त्यांना आरसा दाखवा. जो शिवछत्रपती यांचा असेल. पुढील मकर संक्रांतीला अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची स्थापना होणार आहे. तेव्हा पुन्हा उन्माद माजेल. पण धनुष्यबाण हाती घेतलेले व भुवया उंचावणारे प्रभू श्रीराम हवेत की कुटुंबवत्सल आशीर्वाद देणारे प्रभू श्रीराम हवेत, असे विचारावे लागेल", अशा शब्दांत कोल्हे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. 

तसेच आज देश पवार साहेब आणि राष्ट्रवादीकडे मोठ्या आशेने बघत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा आपला पक्ष आहे. आपण कोणीच या महापुरुषांना पाहिले नाही. परंतु या महापुरुषांच्या विचारांची ज्योत घेऊन ती तेवत ठेवणारा एक व्यक्ती ५०-५५ वर्षे महाराष्ट्राने पाहिली आहे. ती व्यक्ती म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब. जेव्हा धार्मिक आणि जातीय विष कालवण्याचा अंधार दाटतो तेव्हा या मशालीच्या उजेडाचा प्रकाश आपल्याला दिशा दाखवेल याकडे पूर्ण देशाचे लक्ष आहे. म्हणूनच ही जबाबदारी खांद्यावर घेऊन पुढील काळात आपण सर्वजण शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत राहूया, असे अमोल कोल्हे यांनी अधिक सांगितले.

 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्रमुख्यमंत्रीअजित पवार