Join us

प्रसाद लाड यांचं शिवरायांबाबत विधान; अमोल कोल्हे पुस्तक वाचत होते, ते ऐकलं अन्..., पाहा Video

By मुकेश चव्हाण | Published: December 04, 2022 2:19 PM

भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या शिवाजी महाराज यांच्या विधानावरुन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी टीका केली आहे.

मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आहे. रायगडावर त्यांचे बालपण गेलं आहे. स्वराज्याची शपथ महाराजांनी रायगडावर घेतल्याचं विधान भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. प्रसाद लाड यांच्या या विधानावरुन राज्यात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे. तसेच विरोधकही आक्रमक झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील प्रसाद लाड यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. काय ते अगाध ज्ञान...अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की, अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे इतिहासाचे दाखले देण्यास एकतर मनाई करावी किंवा अशा व्यक्तींना इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून किंवा कोणत्याही शिवभक्ताकडून विशेष प्रशिक्षण देण्यात यावे.. अन्यथा आम्हाला तरी सांगावे की हा इतिहास कुठे शिकावा, कुणी सांगावा?, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

अमोल कोल्हेंनी सदर ट्विट केल्यानंतर आणखी एक ट्विट करत व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमधून अमोल कोल्हेंनी प्रसाद लाड यांना कोपऱ्यापासून नमस्कार केला आहे.

दरम्यान, छत्रपती शिवराय हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहेत. महाराजांची कर्मभूमी कोकण होती, स्वराज्याची मुहूर्तमेढ कोकणात रोवली गेली हे देखील विसरून चालणार नाही. अनावधानाने माझ्याकडून दुसरा शब्द प्रयोग झाला. परंतू, त्वरित चूक दुरुस्त केल्याचे प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. विश्वाचे आराध्य दैवत शिवरायांचा सन्मान आम्ही यापुढेही ठेवणार. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असे प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :डॉ अमोल कोल्हेप्रसाद लाडछत्रपती शिवाजी महाराजभाजपाराष्ट्रवादी काँग्रेस