मुंबई - राज्यातील काही मंत्री, अनेक आमदारांना कोरोनाची लागण झाली असून कित्येकजण कोरोनावर मात देऊन घरी परतले आहेत. मात्र, नेत्यांनाच कोरोना झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांना, स्वीय सहायकांनाही कोरोनाची चाचणी करावी लागली आहे. मात्र, खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या स्वीय सहायकास कोरोनाची लागण झाल्याने त्यांना कोरोना चाचणी करावी. त्यासाठी, मुंबईतील केईएम रुग्णालयात जाऊन त्यांनी कोरोनाची चाचणीचा अनुभव शेअर केला आहे.
राज्यात कोविड रुग्णालयात नागरिकांनी, रुग्णांची फरपड होत असून नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. तर, रुग्णांना येणाऱ्या बिलासंदर्भातही विरोधकांनी व रुग्णांच्या नातेवाईकांनी आवाज उठवला आहे. मात्र, डॉ. कोल्हे यांनी केईएम रुग्णालयात आपण ओळख लपवून गेलो होतो, तरी तेथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या सेवेचा मला सुखद अनुभव आल्याचे त्यांनी म्हटलं आहे. डॉ. कोल्हे हे स्वत: डॉक्टर आहेत, त्यामुळे डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्राचा त्यांना जवळून अनुभव आहे. त्याच पार्श्वभूमीवर तेथील डॉक्टरांच्या परिश्रमाचं कोल्हेंनी कौतुक केलंय. कोल्हेंनी आपल्या फेसबुक पेजवरुन हा अनुभव शेअर केला आहे.
कोल्हेंची फेसबुक पोस्ट
महानगरपालिका रुग्णालयातील कोविड टेस्ट चा सुखद अनुभव !
माझे स्वीय सहाय्यक कोरोनाबाधित झाल्यामुळे आणि मी त्यांच्या संपर्कात असल्यामुळे माझी कोविड चाचणी आज मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयात करून घेतली. रीतसर रांगेत उभं राहून, मास्कच्या आड ओळख लपवून. प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की सुखद अनुभव होता अगदी याच ठिकाणी आपण शिकलो आहोत याचा अभिमान पुन्हा जागृत व्हावा असा !
मला मनापासून कौतुक वाटलं रेसिडेंट डॉक्टर्स आणि इंटर्नसचं ! डॉ. योगेश, डॉ. पायल, डॉ. सुजित आणि शुभम यांच्याशी आज टेस्ट दरम्यान संपर्क आला. अंगात घातलेले PPE सुट्स, लागलेल्या घामाच्या धारा सगळं असूनही चेहऱ्यावर (मास्कच्या आडून दिसतो तेवढ्या ) त्रागा नाही, आवाजात चिडचिड नाही. अगदी सराईतपणे हाताळलं जात होतं त्याबद्दल मनापासून कौतुक. फार्माकॉलॉजी, पॅथॉलॉजी मेडिसिन सगळ्या शाखांच्या रेसिडेंट्स ची सरमिसळ झाली आहे पण ज्या सुसूत्रतेने परिस्थिती हाताळली जाते आहे ती काबिले तारीफ म्हणायला हवी. कोरोनाच्या या लढाईत मास्क, व्हेंटिलेटर, आस्थापना याबरोबरच कुशल मनुष्यबळ देखील तेवढंच महत्वाचं हे पुन्हा अधोरेखित झालं.