Join us

शोभा डे यांनी लठ्ठपणावरून खिल्ली उडवलेल्या त्या पोलीस अधिकाऱ्याचा कायापालट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2018 2:15 PM

डाएट आणि व्यायाम करुन अजून 30 किलो वजन कमी केल्यानंतर आपण शोभा डे यांना नक्की भेटू.

मुंबई: गेल्यावर्षी स्तंभलेखिका शोभा डे यांच्या एका ट्विटमुळे चर्चेत आलेले मध्य प्रदेशातील पोलीस कर्मचारी दौलतराम जोगावत हे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. शोभा डे यांनी महानगरपालिका निवडणुकीच्यावेळी मुंबईतील पोलीस बंदोबस्तासंदर्भात टिप्पणी करताना जोगावत यांचा फोटो ट्विट केला होता. यावेळी डे यांनी जोगावत यांच्या लठ्ठपणाची खिल्ली उडवली होती. काही दिवसानंतर ही चर्चा आपोआप थंडावलीही होती. मात्र, दौलतराम जोगावत यांनी शोभा डे यांच्या टिप्पणीने नाऊमेद न होता आपले वजन खरचं घटवण्याचे मनावर घेतले. त्यासाठी जोगावत यांनी थेट मुंबई गाठली. मुंबईतील प्रसिद्ध सर्जन डॉ. मुफ्फजल लकडावाला यांनी चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. दौलतराम यांच्यावर तब्बल दीड तास लेप्रोस्कोपिक बँडेड रुक्स गॅस्ट्रीक बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे जोगावत आता 180 किलोवरुन थेट 115 किलोपर्यंत कमी झाले आहे. त्यांनी जवळपास 65 किलो वजन घटवले आहे. डॉ. मुफ्फजल लकडावाला यांनी ही शस्त्रक्रिया मोफत केली.दरम्यान, या शस्त्रक्रियेनंतर जोगावत यांनी शोभा डे यांचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्विट केल्यामुळेच वजन कमी करण्याचा आपण गांभीर्यानं विचार केला, असे जोगावत यांनी सांगितले. आता डाएट आणि व्यायाम करुन अजून 30 किलो वजन कमी करण्याचे उद्दिष्ट जोगावत यांनी डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यानंतर आपण शोभा डे यांना नक्की भेटू, असे जोगावत यांनी सांगितले. 

 

टॅग्स :शोभा डेआरोग्य