Gajanan Kirtikar ( Marathi News) : गेल्या काही दिवसापासून ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांची ईडी चौकशी सुरू आहे. कोरोना काळात स्थलांतरितांना देण्यात आलेल्या खिचडी वितरणात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी सुरू आहे. अमोल कीर्तिकर हे ठाकरे गटाचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे उमेदवार आहेत. तर दुसरीकडे त्यांचे वडील गजानन कीर्तिकर शिंदे गटाचे नेते आहेत, त्यांनी महायुतीचा प्रचार सुरू केला आहे. दरम्यान, अमोल कीर्तिकर यांच्या ईडी चौकशीवरुन गजानन कीर्तिकर संतापल्याचे दिसत आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना त्यांनी ईडीवरुन भाजपावर संताप व्यक्त केला.
अमोल कीर्तिकर आणि सुरज चव्हाण यांच्यावर सुरू असलेल्या ईडी कारवाईवर गजानन कीर्तिकर यांनी संताप व्यक्त केला. शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर म्हणाले, 'ईडीबद्दल माझं स्पष्ट मत आहे की, आता ईडीचे प्रयोग करण्याची गरज नाही. एवढा भक्कम पाठिंबा देशातून भाजपाला आहे, ईडीमुळे जनतेत मोठी चिड निर्माण झाली आहे. लोक ईडीच्या अशा कारवाईला कंटाळली आहेत. त्यामुळे ईडीचे प्रयोग थांबवले पाहिजेत, असं माझं स्पष्ट मत आहे, असंही कीर्तिकर म्हणाले.
"अमोल कीर्तिकर यांच्यावरील ईडी चौकशीचा मला राग येतो, संजय माशेलकर यांची ही कंपनी आहे. त्याच्यामध्ये अमोल, सुरज चव्हाण भागीदार नाहीत मालक नाहीत. पण, सप्लाय चेनमध्ये त्यांनी जीवावर उदार होऊन काम केलं. त्या कंपनीचा तो व्यवसाय होता साहजीक त्याला प्रॉफीट झालं आणि प्रॉफिट झाल्यानंतर ज्याला मानधन म्हणतात ते अमोल आणि सुरज चव्हाण यांना मिळालं. चेकद्वारे ते पैसे बँकेत टाकले त्यावरती इन्कमटॅक्स देखील लोड झाला, यामध्ये मनीलॉड्रिंग नाही. यामध्ये धसगत नाही, यात सर्वसाधारण देशात जे व्यवसाय चालतात तसा तो व्यवसाय होता. यामध्ये घोटाळा म्हटलं जातो ते चुकीचं आहे, असा आरोप कीर्तिकर यांनी केला.
"असे प्रयोग बंद करा"
"याचा तपास ईडी अधिकाऱ्यांनी केला आहे. हे क्रिमीनल काही नाही, याला कस्टुडिअल चौकशीची गरज नाही. पण, सतत डोक्यावर टेन्शन ठेवायचं. अटक केली जाईल सांगून, सतत बोलवलं जायचं. आता परवा परत त्यांना बोलवलं तेच प्रश्न परत विचारले, तेच कागदपत्रे तपासले. चौकशी संपली आहे, पण पुन्हा चौकशी करत आहेत. म्हणून म्हटलं मी हे सगळे प्रयोग बंद करा, अशी माझी विनंती आहे, असंही गजानन कीर्तिकर म्हणाले.