खासदार गजानन कीर्तिकरांनी घेतले मुख्यमंत्र्यांच्या गणपतीचे दर्शन, ठाकरेंची साथ सोडणार?
By मनोहर कुंभेजकर | Published: September 6, 2022 03:05 PM2022-09-06T15:05:17+5:302022-09-06T15:05:45+5:30
एकीकडे शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात याआधी गेले असतांना आता शिवसेना नेते,स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात सामील होण्याचे संकेत मिळत आहे.
मुंबई-
एकीकडे शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात याआधी गेले असतांना आता शिवसेना नेते,स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात सामील होण्याचे संकेत मिळत आहे. काल सायंकाळी खासदार कीर्तिकर यांनी वर्षा वर जावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणपतीचे दर्शन देखिल घेतले आणि नंतर या दोघांमध्ये सुमारे १० मिनीटे चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती आहे. यापूर्वी दोघांची दि,२१ जुलै रोजी कीर्तिकर यांच्या निवासस्थानी भेट झाली होती.
कीर्तिकर यांचे उजव्या पायाचे दि,१३ जुलै रोजी माहिम येथील रहेजा हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झाले होते.त्यामुळे दि,२१ जुलैला दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कीर्तिकर यांच्या गोरेगाव ( पूर्व )आरे रोड येथील स्नेहदीप सोसायटी येथील निवासस्थानी भेट देवून त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली व त्यांना पुष्पगुच्छ दिला होता.शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्री पदे मिळण्याची शक्यता असून अनुभवी किर्तीकर यांना मंत्री पद मिळू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
याभेटी संदर्भात कीर्तिकर यांच्या निकटवर्तीयांशी संपर्क साधला असता,मुख्यमंत्र्यांच्या गणपतीचे दर्शन घेतले म्हणजे काही शिंदे गटात प्रवेश झाला का असा सवाल त्यांनी केला.
याप्रकरणी शिंदे गटाच्या प्रवक्त्या व माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता,खासदार गजानन कीर्तिकर शिंदे गटात सामील झाल्यास त्यांचे स्वागतच आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारसरणीचे आणि सुरवातीपासून त्यांच्या बरोबर असलेले खासदार कीर्तिकर शिंदे गटात सामील झाल्यास त्याचे मोलाचे मार्गदर्शन आमच्या पक्षाला मिळेल.