Join us

झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळण्यासाठी खासदार झाले आक्रमक; ११ सप्टेंबरपासून मुंबईभर आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2021 1:53 PM

अजूनही सदर कायदा लागू झाला नाही आणि मुंबईतील पहिल्या मजल्यावर लाखो झोपडपट्टीवासीयांकडे पुरावे असून सुद्धा त्यांना एसआरएचे घर मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे.

- मनोहर कुंभेजकर 

मुंबई : २०१७ साली तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी एसआरए संबंधित कायद्यात सुधारणा करून पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या स्वप्न म्हणजेच २०२२ पर्यंत सर्व नागरिकांना हक्काचे पक्के घर मिळण्यासाठी आणि मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले होते.  त्यानंतर सरकार बदलले,पक्षभेद दूर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे व संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला होता. 

अजूनही सदर कायदा लागू झाला नाही आणि मुंबईतील पहिल्या मजल्यावर लाखो झोपडपट्टीवासीयांकडे पुरावे असून सुद्धा त्यांना एसआरएचे घर मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे महाआघडी सरकारने सदर सुधारित कायद्याची लवकर अंमलबजावणी करावी या मागणी साठी उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक झाले आहेत. येत्या दि,11 सप्टेंबर पासून उत्तर मुंबईच्या सहा विधानसभा मतदार संघासह संपूर्ण मुंबईत सकाळी 11 ते 5 पर्यंत आंदोलन छेडणार असल्याची माहिती खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकमतला दिली. काल फेसबुक लाईव्ह वर त्यांनी या आंदोलनाची घोषणा केली.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)  सतीश लोखंडे यांच्या बरोबर या संदर्भात महत्वाची बैठक देखिल झाली अशी माहिती त्यांनी दिली. यावर संबंधित अधिकाऱ्यांना तातडीची कारवाईचे आदेश त्यांनी दिले आहे अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी खासदार शेट्टी यांच्या सोबत जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर मुंबई भाजप सचिव विनोद शेलार, जिल्हा सरचिटणीस दिलीप पंडित, निखील व्यास, उपाध्यक्ष युनूस खान, कामगार आघाडीचे किशोर चित्रव, नगरसेवक जगदीश ओझा, नगरसेवक विद्यार्थी सिंह आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते. दि,२६ ऑगस्ट रोजी खासदार शेट्टी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोशियारी यांना २०१७ च्या नवीन झोपडपट्टी पुनर्वसन कायद्याची अमलबजावणी व्हावी यासाठी साकडे घातले होते.               आता आराध्य दैवत गणपती बाप्पा तू आता सदर कायद्याची अंमलबजावणी करण्याची सुबुद्धी या सरकारला दे आणि  झोपडपट्टीतील गोर गरीबांना लवकर न्याय दे यासाठी ऐन गणपतीतच आपण आंदोलनाचा श्रीगणेशा दि, ११ सप्टेंबर पासून करणार असल्याची माहिती खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकमतला दिली. पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचे २०२२ पर्यंत सर्वांना पक्के घर देण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा आणि झोपडपट्टी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी झोपडपट्टीतील काही नागरिक तसेच, प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांची नकारात्मकता व दिरंगाई सर्व दूर करून लवकरात लवकर मुंबई शहराला झोपडपट्टी मुक्त केले पाहिजे असे ठाम मत त्यांनी शेवटी व्यक्त केले.

टॅग्स :गोपाळ शेट्टीभाजपा