संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्धल खा. गोपाळ शेट्टींचा गोरेगावच्या १७ संघटनानांनी केला नागरी सत्कार
By मनोहर कुंभेजकर | Published: March 28, 2023 07:15 PM2023-03-28T19:15:32+5:302023-03-28T19:15:38+5:30
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून सर्वाधिक मतांनी निवडून येणारे ते पहिले खासदार आहेत.
मुंबई: उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांना २०२३ चा संसद रत्न पुरस्कार नुकताच नवी दिल्लीत हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांनी आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केला.लोकसभेत प्रभावी कामगिरी करतांना त्यांनी अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आणि खाजगी विधेयके मांडून आणि त्यावर अभ्यासपूर्ण भाषणे केली.झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, शाळेत भगवद गीतांचे पाठ सुरू करणे, मुलींची लग्नाची वय वाढवणे अश्या अनेक संवेदनशील मुद्दावर त्यांनी संसदेच्या अधिवेशनात आवाज उठविला .तर उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून त्यांची कारकीर्द प्रभावी राहिली आहे.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून सर्वाधिक मतांनी निवडून येणारे ते पहिले खासदार आहेत.
संसद रत्न पुरस्कार मिळाल्याबद्धल खासदार गोपाळ शेट्टी यांचा गोरेगावच्या गुजराथी समाज व १७ संघटनानांनी त्यांचा नागरी सत्कार केला. त्यांचे पालिकेचे एकेकाळचे सहकारी व मुंबईचे माजी उपमहापौर दिलीप पटेल यांनी पुढाकार घेत या सत्कार सोहळ्याचे गोरेगाव पश्चिम येथील जवाहर नगर हॉल मध्ये आयोजन केले होते.यावेळी स्थानिक आमदार व माजी राज्यमंत्री विद्या ठाकूर,भाजप प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर,माजी प्रभाग समिती अध्यक्ष संदीप पटेल,भाजपचे येथील माजी नगरसेवक व प्रतिष्टित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की,बोरिवली पश्चिम येथील लोकमान्य नगर येथील एका झोपडपट्टीतून आपले सामाजिक कार्य सुरू केले होते.१९९२ पासून पक्षाच्या नेत्यांनी व येथील मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवत माझ्या सारख्या कार्यकर्त्याला तीन वेळा नगरसेवक,दोनदा आमदार,आता दोनदा खासदार म्हणून संधी दिली.तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पक्षाने आणि कार्यकर्त्यांनी नेहमीच सहकार्य केले.
या पुरस्काराला मोठे महत्व आहे.माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी देशांतील सर्व पक्षीय उकृष्ट खासदारांच्या कार्याचा गौरव होण्यासाठी संसद रत्न पुरस्काराची मुहूर्तमेढ रोवली होती.अश्या प्रकारच्या पुरस्काराने काम करायला बळ व प्रोत्साहन मिळते.गोरेगावकरांनी या पुरस्काराबद्धल दिलीप पटेल व येथील गुजराथी समाज आणि १७ संस्थांनी नागरी सत्कार आयोजित केल्या बद्धल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.