खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकसभेतील सर्व महत्वपूर्ण समितींचे दिले राजीनामे!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 04:13 PM2021-09-25T16:13:49+5:302021-09-25T16:15:28+5:30
नागरिकांना मिळवून न्याय देण्यासाठी घेतला मोठा निर्णय
मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे श्रद्धास्थान पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आज देशभरात साजरी होत आहे. त्यावेळी उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी बोरिवली पश्चिम,लोकमान्य नगर येथील त्यांच्या कार्यालयातून फेस बुक लाईव्हवरून एक मोठी घोषणा केली.
संसदीय कार्य समिती रेल्वे समिती आणि गृहनिर्माण समिती या सर्व समितींचे राजिनामा दिल्याचे त्यांनी जाहिर केले आहे. लोकमतच्या सदर प्रतिनिधीला फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर त्यांनी ही ब्रेकिंग न्यूज दिली. आपला केंद्रीय समित्यांचा राजिनामा केंद्रीय संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांना पाठविला आहे असे त्यांनी सांगितले. येत्या दि,२६ जानेवारी पर्यंत नागरिकांना जर न्याय मिळाला नाही तर आपण आपल्या खासदारकीचा सुद्धा राजिनामा देऊ असे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या अनेक वर्षांपासून खासदार शेट्टी हे झोपडपट्टी पुनर्वसन आणि त्या ठिकाणी गोरगरिबांना पक्के घर लवकरात लवकर मिळावे यासाठी झटत असतात. २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टी पुनर्वसन करिता नवीन संशोधित कायदा केला. परंतू आज पर्यंत त्या नवीन जी आर अनुसार या कायद्याची अंमलबजावणी होत नाही आणि झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन देखिल होत ही वस्तुस्थिती आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच डॉ.योगेश दुबे यांच्या मार्फत मानव अधिकार आयोगा पर्यंत त्यांनी पाठपुरावा केला. मात्र अजून पर्यंत २०१७ च्या कायद्याची अमलबजावणी होत नसल्याने अनेक प्रकल्प रेंगाळलेले आहे. पहिला माळावर राहणाऱ्यांना सशुल्क घर मिळण्यासाठी ही कोणते ठोस पाऊल या महाविकास आघाडी सरकारने उचललेले नाही.
झोपडपट्टीवासियांना न्याय मिळण्यासाठी खासदार गोपाळ शेट्टी यांनी वारंवार पाठपुरावा , प्रत्यक्ष भेटी गाठी करून प्रशासकीय समित्या नेमण्यात आली पण कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्याने खासदार शेट्टी संतप्त झाले. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे देवेंद्र फडणवीस यांनी केलेला २०१७च्या कायद्याला मंजूरी मिळत नसल्याची टिका त्यांनी केली.
आज त्यांनी फेसबुक लाईव्ह वर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय, तसेच भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या जोडीने देशासाठी मोठे कार्य केले आहे. नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या पदाचा नीट उपयोग झाला पाहिजे असे आपण समजत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीर साठी प्राण गमवले आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर प्रश्न मार्गी लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०२२ पर्यंत सर्वांना पक्के घर मिळावे म्हणून असे स्वप्न असून त्यासाठी मी संघर्ष करत आहे. आणि याच संदर्भात मी आज माझा राजीनामा प्रहलाद जोशी यांना पाठवला असून ते स्वीकारतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यानंतर फेस बुक लाईव्ह नंतर त्यांनी अनेक नागरिकांच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली.