खासदार गोपाळ शेट्टी यांनी आपल्या कुटुंबासह दिली अयोध्येच्या राम मंदिराला भेट
By मनोहर कुंभेजकर | Published: May 23, 2024 09:18 PM2024-05-23T21:18:53+5:302024-05-23T21:19:05+5:30
मुंबई-उत्तर मुंबईचे मावळते खासदार गोपाळ शेट्टी यांनी आपल्या कुटुंबासह आज अयोध्येच्या श्री राम मंदिराला भेट दिली. दर्शनानंतर भावूक झालेले ...
मुंबई-उत्तर मुंबईचे मावळते खासदार गोपाळ शेट्टी यांनी आपल्या कुटुंबासह आज अयोध्येच्या श्री राम मंदिराला भेट दिली.
दर्शनानंतर भावूक झालेले शेट्टी म्हणाले की, “मी 1990 मध्ये प्रथमच एक उत्साही आणि समर्पित कारसेवक म्हणून अयोध्येला आलो आणि त्यानंतर 300 किलोमीटरची पायपीट करून परत आलो. या सर्व घटनांचा कळस म्हणजे दि,6 डिसेंबर 1992 मध्ये झाला, जेव्हा बाबरी मशिदीची इमारत पाडण्यात आली. मलाही ते पाहण्याचा बहुमान मिळाला. निवडणुकीच्या काळात येथील गर्दी आणि नागरिकांची सोय लक्षात घेऊन भाजप नेत्यांनी श्री राम मंदिरात येऊ नये, असा आदेश पक्षाकडून देण्यात आला होता. त्यामुळे मी पक्षाच्या आदेशाचे अक्षरश: पालन केले आणि इच्छा असूनही मी अयोध्येला आलो नाही. दि, 20 मे रोजी महाराष्ट्रातील मतदानाच्या पाचव्या टप्प्यातील शेवटचे मतदान होताच मी माझ्या कुटुंबासह अयोध्या धामचा रस्ता धरला. आज रामललाचे भव्य मंदिर आणि त्यात स्थापित केलेली दिव्य मूर्ती पाहून मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो. हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. भगवान श्री राम लाला यांची मूर्ती पाहिल्यानंतर मला माझ्यात आनंद आणि नवीन ऊर्जा जाणवत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आपला महान भारत सदैव प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत राहील," अशी ग्वाही त्यांनी दिली.