खा. हेमा मालिनी यांना अटल सन्मान देऊन गौरवण्यात येणार
By मनोहर कुंभेजकर | Updated: December 20, 2023 16:27 IST2023-12-20T16:27:32+5:302023-12-20T16:27:50+5:30
वांद्र्यात अटल महाकुंभचे आयोजन.

खा. हेमा मालिनी यांना अटल सन्मान देऊन गौरवण्यात येणार
मुंबई : दीप-कमल फाउंडेशन संस्थेतर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अटल महाकुंभचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांना अटल सन्मान देऊन गौरविण्यात येणार आहे.
यावेळी मराठी-भोजपुरी कलाकार अटलजींच्या कविता सादर करणार आहेत. वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात दि, २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वा. कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक मुंबई भाजप उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा यांनी दिली.
यावेळी अमरजीत मिश्रा म्हणाले की, अभिनेत्री खा. हेमा मालिनी यांना केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते अटल सन्मान स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आ. अॅड.आशिष शेलार हे अध्यक्षस्थानी असतील. तसेच या कार्यक्रमाला उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी मराठी चित्रपट अभिनेत्री आदिती सारंगधर आणि भोजपुरी चित्रपट अभिनेत्री स्मृती सिन्हा या वाजपेयी यांच्या कविता सादर करणार आहेत. निवेदिका स्मिता गवाणकर या सूत्रसंचालन करणार आहेत.