'जलिल हे निजामाच्या विचारणीचे गुलाम', गैरहजेरीनंतर उद्धव ठाकरेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 11:58 AM2019-09-18T11:58:06+5:302019-09-18T12:23:24+5:30
खासदार इम्तियाज जलिल यांच्या ध्वजारोहन सोहळ्याच्या गैरहजेरीनंतर औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जलिल यांच्यावर टीका केली.
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलिल यांच्यावर जबरी टीका केली आहे. संपूर्ण मराठवाड्यात 17 सप्टेंबर हा दिवस मराठावाडा मुक्तीसंग्राम आणि हैदराबाद मुक्तीसंग्राम म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त ध्वाजारोहणही करण्यात येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते औरंगाबादेत ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार इम्तियाज जलिल अनुपस्थित राहिले होते. विशेष म्हणजे आमदार झाल्यानंतर गेल्या 4 वर्षांपासून ते या कार्यक्रमाला एकदाही हजर राहिले नाहीत.
खासदार इम्तियाज जलिल यांच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या गैरहजेरीनंतर औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जलिल यांच्यावर टीका केली. हैदराबादमधून इकडे आले, एमआयएमच्या नावानं आले, दंगली घडवू लागले. ते रझाकाराचीच औलाद आहेत, म्हणूनच ते इकडे आले नाहीत, अशा शब्दात चंद्रकांत खैरे यांनी जलिल यांच्यावर आगपाखड केली. हैदराबाद आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामात निजाम आणि रझाकारांकडून प्रदेशाला स्वातंत्र्य मिळाले. येथील नागरिकांनी मराठवाडा निजाममुक्त, रझाकारमुक्त करण्यासाठी चळवळ उभारली होती. अनेकांनी या लढ्यात आपलं हौतात्म्य दिलं. त्यानंतर, मराठवाडा हा भारताचा भाग झाला. त्यामध्ये, तत्कालीन संरक्षणमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका महत्त्वाची ठरली.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या कार्यक्रमाला गैरहजर होते. याबाबत स्पष्टीकरण देताना, मुंबईत पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे मी तेथे हजर राहू शकलो नाही, असे खासदार जलिल यांनी म्हटले आहे. मात्र, ते गेल्या 4 वर्षांपासून एकदाही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. त्यावरुन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जलिल यांच्यावर टीका केली. 'औरंगाबादचा खासदार कसे काय गैरहजर राहू शकतो? जलील स्वत:ला निजामाच्या विचारसरणीचे गुलाम समजतात म्हणूनच गैरहजर राहिले.' हा प्रकार लाजिरवाणा असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
दादर येथील सावरकर स्मारक सभागृहात ‘वीर सावरकर’ या इंग्रजी पुस्तकाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी उद्धव यांनी राहुल गांधींसह इम्तियाज जलिल यांच्यावरही निशाणा साधला. काँग्रेसने कितीही द्वेष केला तरी सावरकर संपणार नाहीत. सावरकर हा एक विचार आहे. सावरकरांसारख्या देशभक्तांवर टीका करून राहुल गांधींना देशाचा पंतप्रधान बनता येणार नाही, असा टोला राहुल गांधींना लगावला.