मुलुंडमध्ये खासदार किरीट सोमय्यांची फेरीवाल्याला दमदाटी, नोटा फाडून फेकल्या तोंडावर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2018 07:12 PM2018-05-20T19:12:01+5:302018-05-20T19:20:39+5:30
संभाजी मैदान येथील एका फेरीवाल्याला हटविताना रविवारी इशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमैया यांचे रागावरचे नियंत्रण सुटल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांनी फेरीवाल्याला धक्काबुकी करत ग्राहक महिलेने फेरीवाल्याला दिलेल्या नोटा फाडून फेरीवाल्याच्या तोंडावर फेकल्या.
मुंबई - संभाजी मैदान येथील एका फेरीवाल्याला हटविताना रविवारी इशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमैया यांचे रागावरचे नियंत्रण सुटल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांनी फेरीवाल्याला धक्काबुकी करत ग्राहक महिलेने फेरीवाल्याला दिलेल्या नोटा फाडून फेरीवाल्याच्या तोंडावर फेकल्या. अखेर फेरीवाल्याने याप्रकरणी नवघर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन नवघर पोलिसांनी सोमैयांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करत हात वर केले आहेत.
मुलुंड पूर्वेकडील संभाजी मैदान परिसरात सचिन मारुती खरा (३०) हे भाजी विक्रीसाठी बसले होते. खरात यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८ च्या सुमारास सोमैया त्यांच्याकडे आले. तुझा धंदा बंद कर... इथे धंदा करायचा नाही असे बजावले. आणि धक्काबुकी केली. मी धंदा बंद करतेवेळी महिला ग्राहकाकडून भाजीचे पैसे घेत होतो. त्याच दरम्यान सोमैयांनी ते पैसे स्वत:च्या हातात घेतले. आणि दिडशे रुपयांच्या नोटा फाडून फेकून दिल्या.
तसेच त्यांच्या सांगण्यावरुन पोलिसांनी १२०० रुपयांची दंडात्मक कारवाईही केल्याचे त्याने सांगितले.
सोमैयांनी पैसे फाडायला नको होते. ते माझ्या मेहनतीच्या पैसे होते. अखेर काही मुलुंडकरांनी माझ्या बाजूने आवाज उचलल्याने मी नवघर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे.
खरातच्या तक्रारीवरुन सकाळी ११ च्या सुमारास नवघर पोलिसांनी सोमैयांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. सोमैयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नवघर पोलीस ठाण्याबाहेर राजकीय मंडळींनी घेराव घातला. त्यामुळे याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती नवघर पोलिसांनी दिली.