"भीतीमुळे आदित्य ठाकरेंची विधिमंडळाच्या गटनेतेपदी नियुक्ती"; शिवसेना खासदाराचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 05:38 PM2024-11-25T17:38:26+5:302024-11-25T17:39:08+5:30
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांची दोन्ही विधिमंडळाचा संयुक्त गटनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाचे केवळ २० आमदार निवडून आले आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांची दोन्ही विधिमंडळाचा संयुक्त गटनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयानंतर शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांसह आज बैठक झाली. या बैठकीत विधानसभेचे नवनिर्वाचित सदस्य आणि विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते. यावेळी विधानसभेच्या शिवसेना गटनेतेपदी भास्कर जाधव यांची निवड सर्वानुमते करण्यात आली,. प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली. तर, विधानसभा आणि विधान परिषदचे संयुक्त गटनेता म्हणून आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्यणानंतर खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे यांचे आमदार खासदार आणि नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून ते कधीही शिवसेनेमध्ये येऊ शकतात, असा दावा खासदार नरेश मस्के यांनी केला आहे. तर विधिमंडळ नेतेपदी आदित्य ठाकरे यांची नेमणूक करून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा घराणेशाही दाखवल्याचं नरेश मस्के यांनी म्हटले आहे.
"मी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा खासदार आहे म्हणून सहाजिकच वाटतं की त्यांनी मुख्यमंत्री व्हावं. पण शेवटी महायुतीचे नेते निर्णय घेतील. उद्धव ठाकरे यांचे अनेक आमदार, खासदार हे आमच्या संपर्कात आहेतय एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. ते सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. याचे उत्तर तुम्हाला आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्ती केल्यानंतर मिळालं असेल," असं नरेश म्हस्के यांनी म्हटलं.
"उद्धव ठाकरे यांचा त्यांच्या आमदारांवर विश्वास नाही. त्यामुळेच पुन्हा एकदा घराणेशाही सुरू करून इतर ज्येष्ठ आमदारांना डावलून आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्ती केलेली आहे. त्यामागे आपले असलेले आमदार फुटतील असं त्यांना वाटतं आहे. आणि त्यामुळे विधिमंडळ गटनेत्याची भूमिका महत्त्वाची आहे. जर आपण नेमणूक केलेला विधिमंडळ गटनेता दुसरा केला आणि तोच फुटला तर संपूर्ण पक्ष पुन्हा बाजूला होईल या भीतीने आदित्य ठाकरे यांची नेमणूक विधिमंडळ गटनेते पदी केलेली आहे," असा दावा नरेश म्हस्के यांनी केला.