मुंबई: हनुमान चालिसा पठणावरून पेटलेला वाद थेट अटकेपर्यंत पोहोचला आहे. मातोश्रीच्या बाहेर जाऊन हनुमान चालिसा पठण करू, असा इशारा देणाऱ्या खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणांना अटक झाली आहे. समाजात तेढ निर्माण करणारी विधानं केल्या प्रकरणी त्यांच्याविरोधात अटकेची कारवाई झाली आहे. कलम १५३ (अ) च्या अंतर्गत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राणा यांच्या मुंबईतल्या घराबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे चोख पोलीस बंदोबस्तात त्यांना खार पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. तिथे अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पोलिसांनी राणा दाम्पत्याला खार पोलीस ठाण्यात नेताच राणा यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये नवनीत राणा यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना साद घातली आहे. पोलिसांनी आम्हाला जबरदस्तीने पोलीस ठाण्यात नेले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नारायण राणेंच्या राज्यात लोकशाही धोक्यात आली आहे. आम्हाला मदत करावी, असे राणा म्हणाल्या.
भाजप नेते किरीट सोमय्या पोलीस ठाण्यात जाणारशिवसेनेविरोधात सातत्यानं आक्रमक भूमिका घेणारे भाजप खासदार किरीट सोमय्या थोड्याच वेळात खार पोलीस ठाण्यात जाणार आहेत. 'आमदार आणि खासदारांना हनुमान चालिसेसाठी अटक करणाऱ्या महाराष्ट्रातील रावण राजचा निषेध करतो. घोटाळेबाज सरकारचं दहन होण्याची भीती मुख्यमंत्री ठाकरेंना वाटते. मी आज रात्री ९ वाजता खार पोलीस ठाण्यात जाणार आहे,' असं ट्विट सोमय्यांनी केलं आहे.
राणा दाम्पत्याची मुख्यमंत्री ठाकरे, शिवसेना नेत्यांविरोधात तक्रारराणा दाम्पत्याने शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राणा दाम्पत्याने गंभीर आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह खासदार संजय राऊत, अनिल परब आणि ५०० ते ६०० शिवसैनिकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. रवी राणा आणि नवनीत राणा यांनी दाखल केलेली तक्रार पोलिसांनी स्वीकारल्याचे प्राथमिक वृत्त आहे. आपल्या घराबाहेर जमाव जमवून गर्दी करणे. तसेच आपल्या जीविताला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, अशा प्रकारची तक्रार राणा दाम्पत्याने केली आहे. संजय राऊत यांनी प्रक्षोभक विधाने करून शिवसैनिकांना चिथावणी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. आता पोलीस या तक्रारीवर काय कारवाई करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
काल झालेल्या बैठकीमध्ये आजच्या दिवसभराच्या घडामोडींचा आराखडा तयार करण्यात आला. त्यासाठी मातोश्रीसमोर जमाव जमवण्यात आला. संजय राऊत यांनी ट्विट करून जमावाला चिथावणी दिली. आम्ही केवळ हनुमान चालिसा म्हणणार होतो. मात्र आमच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशी चिथावणी दिली गेली. आमच्या घराबाहेर अॅंब्युलन्स आणल्या गेल्या. आता आमच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्यासाठी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब जबाबदार असतील, असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. आता पोलीस या तक्रारीवर काय कारवाई करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.