राणा दाम्पत्य रात्रभर पोलीस कोठडीत; जेलमध्ये नेमकं काय घडलं? नवनीत राणांनी सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 12:37 PM2022-04-24T12:37:03+5:302022-04-24T12:41:28+5:30
राणा दाम्पत्याची कालची रात्र सांताक्रूझ पोलीस कोठडीत; अडचणीत वाढ
मुंबई: राणा विरुद्ध सेना वाद आणखी पेटला आहे. मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा देणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांना काल खार पोलिसांनी अटक केली. समाजात तेढ निर्माण करणारी विधानं केल्यानं राणा दाम्पत्याला अटक झाली. त्यामुळे कालची रात्र राणा दाम्पत्याला पोलीस कोठडीत काढावी लागली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करावी, अन्यथा आम्ही मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करू, असं आव्हान राणा दाम्पत्यानं दिलं होतं. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले. समाजात तणाव निर्माण करणारी वक्तव्य केल्याप्रकरणी खार पोलिसांनी काल राणा दाम्पत्याला अटक केली. त्यामुळे कालची रात्र राणा दाम्पत्याला पोलीस कोठडीत काढावी लागली.
काल रात्री उशिरा राणा दाम्पत्याला सांताक्रूझ पोलीस ठाण्यात हलवण्यात आलं. राणा दाम्पत्यानं पोलीस कोठडीत रात्रभर १०१ वेळा हनुमान चालिसाचं पठण केलं. नवनीत राणांकडून ही माहिती देण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंच्या दबावाखाली पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अटक केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे यापुढे राणा विरुद्ध सेना वाद वाढण्याची शक्यता आहे.
...मग पाकिस्तानात हनुमान चालिसा म्हणायची का?- फडणवीस
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी फक्त हनुमान चालीसा पठण करण्याची इच्छा व्यक्त केली. आता हनुमान चालीसा महाराष्ट्रात म्हटली जाणार नाही, तर मग पाकिस्तानात म्हटली जाणार का? असा सवाल उपस्थित करत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. एका महिलेला हे सरकार इतकं घाबरलं की गुंड पाठवण्यात आले. राज्यात झुंडशाहीचं सरकार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी झुंडशाही सुरू आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.