Join us

कोणाच्याही दबावाला घाबरत नाही, पण...; राणा दाम्पत्याकडून आंदोलन मागे घेण्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 3:08 PM

पंतप्रधान मोदी, विरोधी पक्षनेते फडणवीस यांचं कौतुक आणि मुख्यमंत्री ठाकरेंवर कौतुक करत राणांचं आंदोलन मागे

मुंबई: हनुमान चालिसा पठणावरून राज्यातलं वातावरण तापलं असताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी मोठी घोषणा केली आहे. आम्ही कोणाच्याही दबावाला घाबरत नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या मुंबई दौरा आहे. त्यांच्या दौऱ्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आंदोलन मागे घेत आहोत, अशी घोषणा आमदार रवी राणांनी केली.

गेल्या अडीच वर्षांपासून राज्यावर संकटं येत आहेत. ती दूर व्हावीत यासाठी मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणावी असं आवाहन आम्ही केलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसा म्हटली नाही. उलट त्यांच्या शिवसैनिकांनी आमच्या अमरावतीमधल्या घरावर हल्ला केला. दगडफेक केली. आमच्या मुंबईतल्या घराखालीदेखील मोठ्या संख्येनं शिवसैनिक जमले. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनं आमच्या घरावर हल्ले झाले. यासाठी जबाबदार असलेल्या सर्व शिवसैनिकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राणांनी केली.

मुख्यमंत्री स्वत:च कायदा सुव्यवस्था बिघडवत आहेत. उद्या पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा आहे. त्यात कोणतंही विघ्य येऊ नये यासाठी आम्ही आंदोलन मागे घेत आहोत, अशी घोषणा रवी राणांनी केली. मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसा म्हटली नाही. हा हनुमानभक्तांचा अपमान आहे. त्याचं उत्तर मतदार देतील. गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचं डिपॉजिट जप्त झालं, तशीच अवस्था आता महाराष्ट्रात होईल, असंही राणा म्हणाले.

टॅग्स :रवी राणानवनीत कौर राणाउद्धव ठाकरेशिवसेना