मुंबई- जवळपास १२ दिवस कोठडीत राहिल्यानंतर राणा दाम्पत्याला आज सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. खासदार नवनीत राणा यांना स्पोंडिलोसिस या आजाराचा त्रास असल्यामुळे त्या थेट कोठडीतून बाहेर आल्यानंतर लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या. त्यानंतर रवी राणांची कोठडीतून सुटका झाल्यानंतर ते नवनीत राणांची भेट घेण्यासाठी लीलावती रुग्णालयाच पोहचले.
राणा दाम्पत्यांची १२ दिवसांनंतर भेट झाल्यानंतर दोघांनाही अश्रूंचा बांध फुटला. रवी राणांना पाहून नवनीत राणांना अश्रू अनावर झाले. त्या रडू लागल्या. रवी राणांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. आज सुटका झाल्यानंतर त्यांनी लिलावती रुग्णालय गाठलं आणि पत्नीची विचारपूस केली. बरेच दिवसांनंतर दोघांची भेट झाली. रवी राणांना पाहून नवनीत राणा ढसाढसा रडल्या.
नवनीत राणांची भेट घेतल्यानंतर रवी राणा यांनी तुरुंग प्रशासनावर आरोप केला आहे. नवनीत राणा या गेल्या सहा दिवसांपासून त्यांना स्पॉन्डेलिसिसचा त्रास आहे ,अशी तक्रार करत होत्या, पण प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही, असं रवी राणा म्हणाले.
दरम्यान, नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील निवासस्थान 'मातोश्री'बाहेर 23 एप्रिल रोजी हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचे कारण देत या जोडप्याने ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची त्यांची योजना रद्द केली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती.