उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर हनुमान चालिसेचं पठण करावं; नवनीत राणांचं प्रतिआव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 03:09 PM2022-06-09T15:09:18+5:302022-06-09T15:09:46+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर निशाणा साधला होता.
मुंबई- हिंमत असेल तर काश्मीरात जाऊन हनुमान चालीसा म्हणा, काश्मीर पंडितांची रक्षण करणारी शिवसेना आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आहे म्हणून ही जनता माझ्यावर प्रेम करतेय. मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा असं बाळासाहेब म्हणाले होते, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर निशाणा साधला होता.
आज सगळंकाही ठीक असताना भाजपा कुणालातरी सुपारी देते, हनुमान चालीसा पुढे आणते, भोंगा आणतं, थडग्यावर नतमस्तक व्हायला लावतं. प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा, हा देश माझा धर्म म्हणून घराबाहेर पाऊल टाकायचं. जर कुणी धर्माचं वेड घेऊन आम्ही देशाभिमानी हिंदू म्हणून त्यांच्या अंगावर गेल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरे बुधवारी औरंगाबादच्या सभेत म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या या टीकेनंतर नवनीत राणा यांनीदेखील त्यांना प्रतिआव्हान दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर हनुमान चालिसेचं पठण करावं, असं नवनीत राणा म्हणाल्या. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर असं कधी करणार यावरही त्यांनी भाष्य केलं नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर, बेरोजगारीवरही ते बोलले नाहीत. महाराष्ट्रातील जनतेला उद्धव ठाकरेंकडून अपेक्षा होती. मात्र असं काहीही झालं नाही, अशी टीका खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.
नवनीत राणा, आमदार रवी राणा आणि विरोधी पक्षातील नेतेच नाही, तर महाराष्ट्र आणि देशातील जनता देखील उद्धव ठाकरे यांची आता विचारधारा बदलली आहे, असं म्हणत असल्याचा दावाही नवनीत राणा यांनी यावेळी केला. त्यामुळे नवनीत राणांच्या या टीकेला शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर येणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सध्या गाजणारा हिंदुत्वाचा मुद्दा धरून ते म्हणाले, आमचे हिंदुत्व कसे, हे मोजणारे तुम्ही कोण? ज्यांना आम्ही पंचवीस, तीस वर्ष मित्र म्हणालो, तेच आता हाडवैरी झाले व ज्यांची आम्ही संभावना शत्रू म्हणून केली त्यांनी मैत्रीचा हात पुढे करून उज्ज्वल महाराष्ट्र घडविण्याची संधी दिली. भाजपची नाटके केवळ सत्तेसाठी विरोधी पक्षात असताना भाजप हिंदू हिताच्या घोषणा करीत होता, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर केली.
भाजपचे ही सर्व नाटके केवळ सत्तेसाठी-
हिंदूंचे सणवार असतानाही महागाईविरुद्ध बंद घडवून आणत होता. आता महागाई प्रचंड वाढली आहे. रुपया दररोज गडगडतो आहे. पेट्रोलचे भाव ६० पैसे वाढले म्हणून बैलगाडीने संसदेत जाणारे अटलबिहारी वाजपेयी यांचा भाजप आम्हाला आता पाहायचा आहे, असे हिणवत ठाकरे म्हणाले, भाजपचे ही सर्व नाटके केवळ सत्तेसाठी होती, हे आता स्पष्ट दिसतेय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.