मुंबई: मातोश्री हे आमचेही श्रद्धास्थान आहे. बाळासाहेबांचे विचार ऐकून आम्ही मोठे झालो आहोत. बाळासाहेब ठाकरे आमच्या हृदयात आहेत. आम्ही श्रद्धेने मातोश्रीची वारी करणार आहोत, असे सांगत मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी व्यक्त केला आहे. यावेळेस शिवसेनेवर बोचरी टीका करताना, यांच्याच उमेदवाराचा पराभव करून निवडून आले आहे. स्टंटबाजी करायची असती, तर निवडणुकीवेळी केली असती. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईवर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद आणि त्यांच्या मुलाला मंत्रीपद मिळालेले आहे. महाराष्ट्रात शिवसेनेची स्थिती गोव्याप्रमाणे होईल, असा घणाघात नवनीत राणा यांनी केला आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना, अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले असले, तरी अमरावतीत शिवसेनेच्याच उमेदवाराला पराभूत केले आहे. राजकीय लाभ कसा घ्यायचा हे आम्हाला शिवसेनेने शिकवायची गरज नाही. बाळासाहेबांच्या विचारावर आम्ही आमचे स्थान निर्माण केले आहे. बाळासाहेबांच्या लढाईमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर बसले आहेत. त्यामुळे कोण कोणाचा फायदा घेतोय आणि कसा लाभ करून घेतात, हे त्यांनी आम्हाला शिकवू नये. आम्ही स्वतःहून आमचे भविष्य निर्माण केले आहे. १६ तास काम करून खासदार झाले आहे. कुणाच्या भरवश्यावर किंवा पाठिंब्यावर नाही, या शब्दांत नवनीत राणा यांनी हल्लाबोल केला.
तुम्ही कोणाच्या भरवश्यावर निवडून आलात ते आधी पाहा
देवाचे नाव घेण्यासाठी आणि नामस्मरण करण्यासाठी कुणी आम्हाला शिकवू नये. आम्ही अपक्ष आहोत आणि अपक्ष म्हणूनच लढत आहोत. आम्हाला कुणाच्या पाठिंब्याची गरज नाही. तुम्ही म्हणताय की भाजप आमच्या पाठिशी आहे. तुम्ही कुणाच्या भरवश्यावर निवडून आला आहात, ते आधी पाहा. शिवसेनेचे किती उमेदवार भाजपच्या भरवश्यावर निवडून आले आहेत. लोकसभेत बाळासाहेबांचा छोटा फोटो चालला, पण निवडणुकीत मोदींचे मोठे पोस्टर लावल्यामुळेच तुम्ही निवडून आला. भविष्यात गोव्यात जशी नोटापेक्षा कमी मते मिळाली, तीच स्थिती आता महाराष्ट्रात होईल, या शब्दांत नवनीत राणा यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
दरम्यान, राज्याला लागलेली साडेसाती आणि शनी निघून जावे यासाठीच राज्याचे प्रथम नागरिक असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री'समोर हनुमान चालीसा पठण करण्याची इच्छा आम्ही व्यक्त केली. पण त्यावर आम्हाला मुंबईत येऊन दाखवाच अशी धमकी दिली गेली. आम्ही मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्यावर ठाम आहोत, असे राणा दाम्पत्याने सांगितले.