मुंबई- सामाजिक तेढ निर्माण करणारं विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला वांद्रे न्यायालयानं कोठडी सुनावली आहे. राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सुट्टीकालीन न्यायालयानं हा निकाल दिला. या प्रकरणातील पुढील सुनावणी २९ एप्रिलला होईल. त्याआधी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय राणा दाम्पत्याकडे उपलब्ध आहे.
नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. दोघांनाही वांद्रे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती, मात्र कोरोना चाचणीमुळे तुरुंगात रवानगी होण्यास विलंब झाला. मात्र आता दोघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
नवनीत राणा यांना भायखळा तुरुंगात नेण्यात आले आहे. नवनीत राणांसोबत पोलिसांची तीन वाहने कारागृहात पोहोचली. यामध्येच आता काही वृत्तवाहिनीच्या वृत्तानूसार, नवनीत राणा यांची तब्येत खालावली असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या त्या भायखळा कारागृहाच्या रुग्णालयात दाखल असल्याची माहिती आहे.
वांद्रे न्यायालयात काय घडलं?
सामाजिक तेढ निर्माण करणारं विधान केल्याप्रकरणी कलम १५३ (अ) अंतर्गत काल अटक करण्यात आली. आज त्यांना वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आलं. राणा यांना पोलीस कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली. मात्र न्यायालयानं ही मागणी फेटाळून लावली.
यानंतर राणा दाम्पत्याचे वकील रिझवान मर्चंट यांनी तातडीनं जामीनासाठी अर्ज केला. मात्र जामीन अर्जावर त्वरित सुनावणी घेण्यास न्यायालयानं नकार दिला. न्यायालयानं दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांच्या जामीनावर २९ एप्रिलला सुनावणी होईल. मात्र राणा दाम्पत्याकडे वरच्या न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध आहे.