Join us

"मला दु:ख होतंय की महिलांचा सन्मान..."; सुनील राऊतांच्या विधानावर प्रियांका चतुर्वेदींची स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 3:53 PM

Priyanka Chaturvedi : विक्रोळीचे आमदार सुनील राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी भाष्य केलं आहे.

Vikhroli Assembly Constituency : महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान ठाकरे गटाचे नेते त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटाच्या महिला उमेदवार शायना एनसी यांना 'इम्पोर्टेड माल' असे म्हटलं होतं. सावंत यांच्या या विधानामुळे मोठा गोंधळ उडाला होता. त्यानंतर विक्रोळी विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सुवर्णा करंजे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आणि संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही भाष्य केलं आहे.

अरविंद सावंत यांचे प्रकरण शांत होण्याच्या आधीच आमदार सुनील राऊत यांनी महिला उमेदवाराचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संजय राऊत यांचा भाऊ सुनील राऊत यांनी निवडणूक प्रचारात बोलताना शिंदे गटाच्या उमेदवार सुवर्णा करंजे यांचा अपमान केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी सुनील राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी टीका केली आहे. हे असं पहिल्यांदाच होत असल्याचे मी पाहिलं असल्याचे चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.

"मला दु:ख होत आहे की असे मुद्दे महिलांच्या सन्मानाशी जोडले जात आहेत जे मुळात मुद्देच नाहीत. 'बळीचा बकरा' हा वाक्प्रचार स्त्रियांच्या सन्मानाशी जोडलेल्याचे मी पहिल्यांदाच ऐकले आहे. जेव्हा महिलांना राजकारणात अधिक स्थान मिळेल, संसद असो वा विधानसभा आणि त्यांची संख्या वाढेल, तेव्हा खऱ्या अर्थाने महिलांचा आदर वाढेल. मी मुंबई पोलिसांना विचारू इच्छिते की आता गुन्हे दाखल करण्यासाठी हे मुद्दे उरले आहेत का?," असा सवाल प्रियांका चतुर्वेदी यांनी केला.

काय म्हणाले सुनील राऊत?

"ही लढाई माझ्या जिंकण्याची नाही. मी अजून प्रचाराला सुरुवातही केलेली नाही. ती तिच्या दोन जावयांसह आणि एका मुलासोबत हिंडत असते. ती दोन-चार भाड्याचे कार्यकर्ते आणते. बरोबरीची स्पर्धा असायला हवी. मी सुनील राऊत, संजय राऊत माझा मोठा भाऊ, ज्याने मोदी-शहा यांना हादरवले. त्यामुळे स्पर्धा अशीच व्हायला हवी की, प्रत्येकजण दर्जाचा असायला हवा. पण माझ्यासमोर कोणीही टिकू शकत नाही. माझ्यासमोर येण्याची हिंमत कोणाचीच नव्हती, सगळे मागे होते, त्यामुळे आता कोणाला तरी बकरा बनवायचा होता, म्हणून त्यांनी ती बकरी माझ्या गळ्यात मारली आहे. आता २० तारखेला बोकरीला कापू, असं विधान सुनील राऊत यांनी केलं होतं.

दरम्यान, सुनील राऊत यांच्या या आक्षेपार्ह विधानाबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुवर्णा करंजे यांच्या फिर्यादीवरून विक्रोळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे वक्तव्य महिलांचा अवमान करणारे असल्याची तक्रार सुवर्णा करंजे यांनी विक्रोळी पोलिसात दिली होती. त्याचवेळी गुन्हा दाखल झाल्यानंतर सुनील राऊत यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. २३ तारखेनंतर योग्य उत्तर दिले जाईल, असे सुनील राऊत यांनी म्हटले आहे 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मुंबई विधानसभा निवडणूकविक्रोळीसुनील राऊत