लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मुखपत्रातून बदनामी केल्याच्या आरोपावरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेना (शिंदे गट) खासदार राहुल शेवाळे यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे.
या प्रकरणी दोषमुक्ततेसाठी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी माझगाव येथील दंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, दंडाधिकारी एस. बी. काळे यांनी उद्धव ठाकरे व राऊत यांना दिलासा देण्यास नकार देत त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयाने दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद ऐकून घेत याबाबतचा निकाल राखून ठेवला होता. गुरुवारी न्यायदंडाधिकारी एस. बी. काळे यांनी हा निकाल जाहीर केला. त्यावेळी न्यायालयाने उद्धव ठाकरे व संजय राऊत यांना दिलासा देण्यास नकार देत दोषमुक्ततेची मागणी करणारा त्यांचा अर्ज फेटाळून लावला.
कथित आरोपांप्रकरणी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी कुठलेही पुरावे नाहीत. दोन्ही नेत्यांना नाहक गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, शेवाळे यांचा मानहानीचा अर्ज फेटाळण्यात यावा व उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना दोषमुक्त करावे, अशी मागणी माझगाव दंडाधिकारी न्यायालयात या दोघांकडून करण्यात आली होती. या प्रकरणातील तथ्ये आणि परिस्थिती पाहता आरोपी अर्जात विनंती केल्याप्रमाणे दिलासा मिळण्यास पात्र नाहीत त्यामुळे दंडासह याचिका फेटाळून लावण्यात यावी, अशी मागणी शेवाळे यांनी न्यायालयात केली होती.